ताज्या घडामोडी

गरजू शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या : सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम

कोरोना बाधीतांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय मनुष्यबळाला आवश्यक संरक्षक सामुग्री उपलब्ध करून द्या

सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा १०० च्या वर गेला असला तरी उपचाराखालील रूग्णांची संख्या 47 आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व आरोग्य यंत्रणेने त्वरेने केलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, असे सांगून पुढील महिन्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून त्या दृष्टीने आवश्यक ती सर्व तयारी ठेवावी. ऑक्सीजन, व्हेंटीलेटर्स, औषधसाठा याबरोबरच कोरोना बाधीतांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय मनुष्यबळाला आवश्यक संरक्षक सामुग्री उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोराना व विविध विषया संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज चे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भूपाल गिरीगोसावी, जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत आरोग्य, कृषि यासह अन्य विषयांशी संबंधित विविध मुद्यांचा आढावा घेताना राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, खरीप हंगामासाठी जिल्ह्याला असणाऱ्या पीक कर्जाचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करा. शेतकऱ्यांना सुलभ व गतीने कर्ज वितरण करा. जे शेतकरी खरोखर गरजू आहेत ते पीक कर्जापासून वंचित राहणार नाहीत याची सर्वोतोपरी दक्षता घ्या. शेतकऱ्यांना खरीपासाठी खते, बी-बियाणे व किटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील याची योग्य ती खबरदारी घेऊन शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर बी-बियाणे व किटकनाशके पोहोच करण्यासाठी आवश्यक तजवीज करा. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टोळधाडीचे संकट आले असून या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या कृषि यंत्रणेने अलर्ट रहावे व नियत्रंणासाठी आराखडा तयार करावा. कोरोना बाधित कुटुंबाला क्वारंटाईन करत असताना त्यांच्या पशुधनासाठीही प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
परराज्यातील कामगार, मजूर लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या मूळ गावी गेल्यामुळे उद्योजकांना त्या दृष्टीने निर्माण झालेली अडचण कशा पध्दतीने सोडविता येईल याचा विचारविमर्श करण्यासाठी प्रशासनाने उद्योजकांसोबत स्वतंत्र बैठक घ्यावी, असेही राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी यावेळी सूचित केले.
ग्रामीण भागात असणाऱ्या रूग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे कामाच्या ठिकाणी निवासी रहात असल्याबाबत खातरजमा करावी. तसेच ज्या शासकीय निवासस्थानांमध्ये सदर व्यक्ती रहात असतील त्या ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या अडचणी समजून घेऊन आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देशही राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी जिल्हा परिषद यंत्रणेला दिले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close