ताज्या घडामोडी

कोरोना : विविध धर्मातील प्रभावशाली व्यक्ती, धर्मगुरुंसमवेत          मंत्री राजेश टोपे, नवाब मलिक यांचा संवाद

मुंबई : कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या व्यापक उपाययोजनांच्या अनुषंगाने आज सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि अल्पसंख्याक विकास तथा कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी राज्यातील विविध धर्मातील प्रभावशाली व्यक्ती, धर्मगुरु, धार्मिक नेते आदींबरोबर युनिसेफच्या सहकार्याने व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. कोरोनासंदर्भात लोकांमध्ये भीती आणि गैरसमजाचे वातावरण आहे. त्यामुळे लागण झालेले अनेक रुग्ण शेवटच्या क्षणाला उपचारासाठी दवाखान्यात येतात. लोकांच्या मनातील हे गैरसमज दूर करण्यासाठी धार्मिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी मंत्री टोपे आणि मलिक यांनी केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनामार्फत करण्यात येत असलेल्या सर्व प्रयत्नांमध्ये आम्ही सोबत राहू, अशी ग्वाही यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिली.

कोरोनासंदर्भातील गैरसमज दूर करण्यासाठी धार्मिक नेत्यांनी पुढे यावे

मंत्री राजेश टोपे

आरोग्यमंत्री टोपे यावेळी म्हणाले की, लोकांच्या मनामध्ये कोरोनाविषयी भिती आणि गैरसमज आहेत. त्यामुळे अजुनही अनेक लोक उपचारासाठी पुढे येत नाहीत असे लक्षात आले आहे. अनेक जण लक्षणे दिसूनही ती लपवून ठेवत आहेत. अशा वेळी या व्यक्ती शेवटच्या क्षणाला दवाखान्यात दाखल झाल्यास त्यांच्यावर उपचार करणे कठीण जाते. त्यामुळे कोरोनासंदर्भातील मनातील भिती दूर करुन लोकांनी तपासणीसाठी पुढे आले पाहिजे. धार्मिक नेते, संस्थांनी याबाबत लोकांचे प्रबोधन करावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्यात १०० कोरोना रुग्णांपैकी ९७ रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. हेही लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

आता तरुणांना रोजगारासाठी प्रयत्न

मंत्री नवाब मलिक

अल्पसंख्याक आणि कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी युनिसेफमार्फत आयोजित या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की, कोरोनाविषयी लोकांच्या मनामध्ये आजही मोठी भिती आणि गैरसमज आहेत. अनेकजण लक्षणे दिसूनसुद्धा उपचारासाठी पुढे येत नाहीत. लोकांच्या मनातील ही भिती आणि गैरसमज दूर करण्यासाठी धार्मिक संस्था आणि धार्मिक नेत्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कौशल्य विकास विभागाने राज्यातील अनेक तरुणांना विविध प्रकारची कौशल्यविषयक प्रशिक्षणे दिली आहेत. आता राज्यात उद्योगांमध्ये या विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी हा विभाग यापुढील काळात मोठे कार्य करेल, असे त्यांनी सांगितले. सर्व धर्म समुहांनी मिळून कोरोनाचा मुकाबला करुन लवकरच आपण या संकटावर मात करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र शासनाच्या सोबत राहू

धर्मगुरुंनी दिला विश्वास

व्हीडीओ कॉन्फरन्समध्ये राज्याच्या विविध धर्माचे मान्यवर सहभागी झाले होते. यात प्रमुख्याने श्री. नम्रमुनी महाराज, आचार्य श्री. देवानंद गुरुदेव, मौलाना मेहमूद दर्याबादी, मौलाना हाफीज सयिद अथर अली, आर्ट ऑफ लिव्हींगचे दर्शक हाथी, अंजुमने इस्लाम संस्थेचे डॉ. जहीर काझी, ब्रम्हकुमारी कमलेश, भंते शांतीरत्न, बिशप ऑल्वीन डिसिल्व्हा, इशा फाऊंडेशनच्या कल्पना मानियार, इस्कॉनचे गोकुळेश्वर दास, जमाते इस्लामी हिंदचे डॉ. सलीम खान, जमियते उलेमाचे महाराष्ट्र अध्यक्ष मौलाना हाफीज मोहम्मद नदीम सिद्दीकी, रामकृष्ण मिशनचे स्वामी देवकांत्यानंद, युनायटेड सिख सभा फाउंडेशनचे रामसिंग राठोड आदींनी सहभाग घेतला. या विविध संस्थांमार्फत कोरोना संकटग्रस्तांना मदत करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी यावेळी माहिती दिली. तसेच यापुढील काळातही या संकटाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सोबत राहू, असा विश्वास या सर्वांनी दिला.

कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील, युनिसेफच्या महाराष्ट्र राज्य प्रमुख राजेश्वरी चंद्रशेखर, डॉ. राहुल शिंपी यांनीही व्हीडीओ कॉन्फरन्समध्ये सहभाग घेतला. युनिसेफच्या देविका देशमुख यांनी कॉन्फरन्सचे संचलन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close