आरोग्यमहाराष्ट्रसांगली

सांगली जिल्हा नॉन रेड झोन : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना शासनाने जाहीर केल्या असून त्यामध्ये रेड झोन आणि नॉन रेड झोन असे दोन भाग केले आहेत. संपुर्ण सांगली जिल्हा ‘नॉन रेड झोन’ मध्ये असून काही ठिकाणी कंटेंमेंट झोन आहे. ‘नॉन रेड झोन’मध्ये बाजारपेठा, दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी पाचपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना दि. २२ मे पासून लागू होणार आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.
लॉकडाऊन ४.० मध्ये खालील बाबींना बंदी असेल
आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विमानवाहतूक यांना बंदी, शाळा, महाविद्यालये, शिक्षण संस्था, प्रशिक्षण देणाऱ्या संस्था विविध वर्ग (क्लासेस) यांना बंदी. ऑनलाईन/ ई- लर्निंग शिक्षणाला उत्तेजन देण्यात येईल. त्याशिवाय ठराविक बस डेपो, रेल्वे स्थानके येथील कॅन्टीन व्यवस्था सुरू राहील. याव्यतिरिक्त बाकी सर्व उपहारगृहे आणि हॉटेल्स बंद राहतील. मात्र उपाहारगृहातील घरपोच व्यवस्था सुरु राहील.
सर्व चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, क्रीडा संकुल, तरणतलाव, करमणूक संकुले, नाट्यगृहे, बार आणि ऑडिटोरियम, हॉल यांना पूर्णपणे बंदी.
सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक सण आणि कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी. सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे यांना बंदी. धार्मिक कारणासाठी एकत्र येण्यावर बंदी. कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी निर्धारित केलेल्या राष्ट्रीय मार्गदर्शक सूचना व तरतुदी कायम राहतील.
अत्यावश्यक सेवा वगळता रात्री 7 ते सकाळी 7 वाजता या दरम्यान संचारबंदी असेल. स्थानिक प्रशासन यासंदर्भात सीआरपीसीचे कलम 144 आणि इतर नियमांनुसार आदेश जारी करुन याची कडक अंमलबजावणी करेल. ज्येष्ठ नागरिक, बालकांची सुरक्षा 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि 10 वर्षाखालील मुले यांनी अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारण वगळता घरातच थांबणे आवश्यक आहे. कंटेनमेंट झोन्स – कंटेनमेंट झोन मध्ये सुरु असणाऱ्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच कार्यवाही होईल त्यामध्ये कोणताही बदल नाही. केवळ अत्यावश्यक सेवा व अत्यावश्यक वस्तु यांनाच परवानगी असून लॉकडॉऊनचे नियम काटेकोरच असतील. कंटेनमेंट झोन क्षेत्रात फक्त अत्यावश्यक बाबींसंदर्भातील कार्याला परवानगी देण्यात येत आहे. वैद्यकीय कारण आणि अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा वगळता अन्य कोणत्याही कारणासाठी या क्षेत्रात लोकांना बाहेर जाण्या-येण्यास पूर्णत: प्रतिबंध करण्यात येत आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शिकेतील सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
आरोग्य सेतू ॲपचा वापर करावा
आरोग्य सेतू ॲप हे कोरोना संसर्गाच्या संभाव्य जोखमीची लवकर ओळख करण्यास मदत करते. हा ॲप व्यक्ती आणि समुदायासाठी ढाल म्हणून कार्य करतो. कार्यालये आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता ठेवण्याच्या दृष्टीकोनातून मोबाइल फोन असलेल्या सर्व कर्मचार्‍यांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावे. नागरिकांनी त्यांच्या मोबाइल फोनवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावे व त्यांच्या आरोग्य स्थितीची माहिती त्यावर अद्यावत ठेवावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. आजाराचा धोका असलेल्या व्यक्तिला या ॲपमुळे वेळेवर वैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होईल.

क्रीडा संकुल, खेळाचे मैदान आणि अन्य सार्वजनिक खुल्या जागा या व्यक्तिगत व्यायामासाठी खुल्या राहतील; तथापि, प्रेक्षक आणि समूह व्यायामप्रकार किंवा खेळ आदींना अनुमती नसेल. सर्व शारीरिक व्यायाम इत्यादी हे योग्य शारीरिक अंतराचे (सोशल/ फिजिकल डिस्टंसिंग) नियम पाळून करता येतील.
सर्व सार्वजनिक आणि वैयक्तिक वाहतुकीचे व्यवस्थापन खालीलप्रमाणे करावे. दुचाकी वाहने : १ चालक (रायडर)/ तीनचाकी वाहन : १ अधिक २/ चारचाकी वाहन : १ अधिक जिल्ह्याअंतर्गत बस वाहतूक ही आसनक्षमतेच्या कमाल ५० टक्के क्षमतेनुसार चालविण्यास परवानगी राहील. तथापि, बसमध्ये योग्य शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन होण्यासह बसचे निर्जंतुकीकरण (सॅनिटायजेशन) करणे आवश्यक राहील. आंतरजिल्हा बस सेवेच्या अनुषंगाने वेगळे आदेश निर्गमित करण्यात येतील. सर्व दुकाने (मार्केट/शॉप्स) सकाळी ९ वा. ते सायं. ५ वा. या कालावधीत चालू ठेवता येतील. कुठेही गर्दी किंवा योग्य शारीरिक अंतराच्या नियमांचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास अशी दुकाने तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात येतील.
सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून लग्न समारंभाना 50 व्यक्ती पर्यंत परवानगी देण्यात आली आहे तसेच अत्यंविधीसाठी देखील 50 व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. लिकर, पान, तंबाखूजन्य पदार्थ यांचे सार्वजनिकरित्या सेवन करण्यावर बंदी असून पानपट्टी उघडी राहतील परंतु सार्वजनिकरित्या या पदर्थांचे सेवन करता येणार नाही. याचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्यात येईल. केवळ पार्सल सर्व्हिस सुरु राहील. सोलश डिस्टसिंगच्या सर्व नियमांचे पालन बंधनकारक राहील.
ग्रामस्तरीय समित्यांनी आपली जबाबदार चोख पार पाडावी
सध्याचा काळ हा अत्यंत कठीन असून जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात हॉटस्पॉटमधून लोक येत आहेत. त्याच वेळी बाझारपेठा, दुकानेही उघडल्याने लोकांची हालचाल मोठ्याप्रमाणार सुरु होणार आहे. त्यामुळे संसर्ग झपाट्याने पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनी मोठ्याप्रमाणावर काळजी घ्यावी मास्क, सॅनिटाझर, सोशल डिस्टसिंग यांचा गार्भीयाने वापर करणे आवश्यक आहे. चेकपोस्ट चुकवुन लोक जिल्ह्यात येत असल्यास ग्रामस्तरीय समित्यांनी अत्यंत जागृत राहून त्याची माहिती वेळीच प्रशासनाला देण्यात यावी. ज्या ग्रामस्तरीय समित्या आपली जबाबदार चोख पार पाडणार नाहीत त्यांच्यावर करवाई निश्चित करण्यात येईल. होम क्वारंटाईमध्ये असणारे योग्य पध्दतीने पालन करतात की नाही यावरही काटेकोर निघराणी ठेवणे आवश्यक आहे. तसेच कम्युनिटी क्वारंटाईनसाठी आवश्यक सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात आरोग्य यंत्रणेबरोबरच स्थानिक प्रशासनाचीही जबाबदारी मोठी आहे.
रस्ते व गावे अनावश्यक बंद ठेवू नयेत
गावात सार्वजनिक रस्ते बंद करण्यात आले आहेत. ते तात्काळ सुरु करणे आवश्यक असून याशिवाय शासनाच्या आदेशाशिवाय काही ठिकाणी स्थानिकपातळीवर आनावश्यक लॉकडाऊन जाहीर केला जातो तो सर्वथा चुकीचे असून अशा प्रसंगात लोकांची मोठ्याप्रमाणावर असुविधा होत असल्याने या प्रकरणी कारवाई करण्यात येईल. त्यामुळे स्थानिक प्रतिनिधींनी अशा प्रकारे लॉकडाऊन केला जाणार नाही याची दक्षता घ्यावी. लोकांनी बाहेरुन येणाऱ्या लोकांची प्रशासनाला माहिती द्यावी, नोंद ठेवावी, आरोग्य तपासणीचा पाठपुरावा ठेवावा, कम्युनिटी क्वारंटाईनला सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात व शासनाने निर्गमित केलेल्या आदेशांच्या अंमलबजावणीसाठी मदत करावी.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close