महाराष्ट्रविचारपुष्प

सामान्यांची लालपरी … धावली श्रमिकांच्या जीवासाठी… !!

गाव तिथे एसटी, प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन 1जून 1948 पासून धावते आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एसटीची सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. अनेक पाडे आणि खेड्यापासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी हक्काचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. आजारी व्यक्तींना खेड्यापासून तालुका आणि जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी हक्काचे आणि सुरक्षित प्रवासाचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. सामाजिक जबाबदारी म्हणून एसटी ने आता पर्यंत राज्यातील आपत्ती असेल, निवडणुका असतील त्यात सहभाग नोंदवून उपयुक्तता सिद्ध केली आहे. एसटीची सुरुवात झाल्या पासून महाराष्ट्राच्या रस्त्यावर एसटीचे चाक कधी थांबले नव्हते पण पहिल्यांदा कोरोना ( कोविड 19 ) या जागतिक संकटांने मात्र प्रत्येक डेपोत शेकडो गाड्या चक्काजाम होऊन थांबल्या आहेत. मात्र शासनाने इतर राज्यातील श्रमिक या परिस्थितीत सुरक्षितपणे त्यांच्या गावी पोहचावेत म्हणून एसटी ला हाक दिली. एसटीचे सर्व अधिकारी, चालक, वाहक या मोहिमेसाठी तयार झाले.
सातारा जिल्ह्याचे एसटीचे प्रमुख सागर पळसुले यांच्याशी याबाबतीत संपर्क साधला त्यांनी लगेच किती बस कुठे गेल्या.. याचा तपशील आम्हाला दिला. काल मध्य प्रदेशच्या रेवा येथे श्रमिक रेल्वे गेली.. आज राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथे गेली त्यावेळी जिल्ह्यातील अकरा तालुके आणि मोठ्या गावातील सर्व श्रमिकांना विना मोबदला सातारा रेल्वे स्थानकावर सोडले. कोणत्याही उपकाराची भावना न ठेवता एक सामाजिक दायित्व म्हणून कोणतेही आढेवेढे न घेता मोठ्या उत्साहानी चालक आणि वाहक यांनी ही जवाबदारी फत्ते केली. तामिळनाडूतील सेलम असेल वा उत्तर प्रदेशातील वाराणसी, मध्यप्रदेशातील सुलतानपूर अशा ठिकाणी महाराष्ट्राच्या सर्व सामान्यचं भूषण असलेली एसटी तिथे गेली लोकांना सुखरूप पोहचवले लोकांच्या दुवा घेऊन चालक आणि वाहक परतले. अजूनही काही गाड्या बाहेरच्या राज्यात जायाला सज्ज झाल्याचे पळसुले यांनी सांगितले.

*कुठे कुठे गेल्या गाड्या*
महाराष्ट्र राज्य मार्ग परिहवन महामंडाच्या सातारा विभागामार्फत 7 मे रोजी सातारा ते पॉडेचरी 23 प्रवाशी, सातारा ते राजस्थान येतील राणिवाडा 23 प्रवाशी, वडूज राणिवाडा 22 प्रशाशी असे एकूण 68 प्रवाशी एसटीमहामंडळाच्या बसेसने सोडण्यात आले.
9 मे रोजी सातारा-वडूज ते भंडारा 22, 10 मे रोजी मेढा ते उतर प्रदेशत येथील वाराणसी येथे 23 असे एकूण 45 प्रवाशी सोडण्यात आले.
11 मेरोजी वडूत ते कर्नाटक राज्यातील हल्ल्याळ येथे 22, कराड ते तामिळनाडू येथील शेलम 9 एसटी बसेस सोडण्यात आल्या आहेत यातून 201 प्रवाशी सोडण्यात आले आहेत. सातारा ते मध्य प्रदेश येथील सुलतानपूर येथे 23 प्रवाशी सोडण्यात आले आहेत. तसेच महामंडळाच्या सातारा विभागामार्फत हैद्राबाद व गुलबर्गा येथे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांना सोडण्यात आले आहे.
केंद्र सरकारनी परवानगी देताच शेकडो लोकांना रेल्वे आणि बसनी सोडण्याची तत्परता शासनांनी दाखवली आणि महाराष्ट्र कोणत्याही प्रसंगात आपलं सर्वस्वपणाला लावून झुंजतो हे या कोरोनाच्या जागतिक संकटातही अनेक उदाहरणांनी दाखवून दिले आहे. आम्ही संकटालाही धीराने भिडतो हा आमचा इतिहास आहे तोच धागा वर्तमानतही आम्ही गिरवतो त्यामुळे या कोरोना संसर्गावरही मात करू असा निर्धार करून सर्वजण लढतायत आपापल्या जागेवरून.. चला कोरोनावर मात करू या… !!

युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, सातारा

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close