भिलवडीत चोरी चुपके अनेक वस्तूंची विक्री, वरतोंड करून फिरणाऱ्यांची संख्याही जास्त
कारवाई करण्याची लोकांची मागणी
सांगली/भिलवडी : अभिजीत रांजणे
पलूस तालुक्यातील भिलवडी येथे गेल्या दोन दिवसांपूर्वी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय झाले. मात्र, ठरवून दिलेल्या दिवसाला हरताळ फासत काही लोक घरांमधून आणि चोरी चुपके भाजीपाला व फळ, इतर वस्तू विक्री करत आहेत. तर वरतोंड करून फिरणाऱ्यांची संख्या जादा आहे, यावर वेळीच कारवाई करावी ,अशी लोकांतून मागणी होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार भिलवडी गावामध्ये स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गावात लोकांच्या संरक्षणासाठी विविध ठराव बैठकीत घेतले. काही ठरवला त्यातील अनेकांनी विरोध केला. मात्र, कागदी घोडे नाचवण्याच्या नादात मुख्य ठरावाकडे दुर्लक्ष करण्यात आले. हे जरी खरे असले तरी या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःपुरता विचार न करता गावामध्ये अनेक लोकांचा विचार करण्याची गरज आहे. आज रोजी राज्यातील अनेक ठिकाणाहून येणाऱ्या लोकांची संख्या भिलवडी गाव सुशिक्षित असल्यामुळे आणि या गावातील लोक इतर ठिकाणी नोकरीस असल्याने नक्कीच जास्त असणार आहे. त्यामुळे या समितीने ठोस निर्णय घेतला पाहिजे. राजकारणाने चालढकल सोडली पाहिजे. प्रशासकीय अधिकारी यांनी आपली प्रशासकीय फक्कड कायम ठेवली पाहिजे. नाहीतर तीन तेरा वाजण्यास वेळ लागणार नाही. समितीमधील लोकांनी गावासाठी आपली भूमिका काय असेल, हेही वेळीच ठरवले पाहिजे.
‘कोरोना’ संसर्गजन्य आहे. हे अनेकांना माहित आहे, तरीही काही अक्कलशुन्य लोक शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार आणि पोलिसांना चुकवीत गावात वरतोंड करून फिरताना दिसत आहेत. या अक्कलशून्य फिरणाऱ्या लोकांमुळे भिलवडी गावातील इतरांना नक्कीच त्रास होणार आहे. त्यामुळे अक्कलशून्य लोकांनी आपण पोलिसांना फसवत नसून आपण स्वतःलाच फसवत आहे, हे तितकेच ध्यानात ठेवायची गरज आहे. एखाद्या पोलिसांची नजर चुकवून बोंबलत फिरणे आणि आपला मोठेपणा गाजवणे, हे त्यांचे मूर्खपणाचे लक्षण आहे.
भिलवडी गावातील लोकांनीही स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीला सहकार्य करण्याची गरज आहे. उगीच ठरवून दिलेले नियम असतात, असे न करता भाजीपाला आणि फळे विक्री वेळेतच करावी. आपत्ती व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एखादी गावातून चक्कर मारावी. ठरवून दिलेल्या नियमानुसार जो व्यापारी वागत नसेल, त्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जाणकारांतून होत आहे.