मानसिक आरोग्य कक्षामार्फत 5 हजार जणांचे समुपदेशन व औषधोपचार
सांगली : पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली येथील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामध्ये गेल्या दोन महिन्यापासुन कोविड-19 आजारासाठी मानसिक आरोग्य कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यामार्फत आतापर्यंत 5 हजार जणांचे समुपदेशन व औषधोपचार करण्यात आले आहे. या कक्षामध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत मानसोपचारतज्ञ डॉ. जगानन साकेकर, मानसशास्त्रज्ञ डॉ. माणिकराव सुर्यवंशी, समुपदेशक अविनाश शिंदे, मनोविकृती परिचारक लॉरेन्स आवळे यांच्याबरोबर सांगली जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालये, ग्रामणी रुग्णालये, महापालिका रुग्णालये येथील एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र यामध्ये कार्यरत असणारे समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, समुपदेशनाचे काम करीत आहेत.
आतापर्यंत सांगली जिल्ह्यातील निवारागृहात राहणाऱ्या परप्रांतीय मजूरांचे व विद्यार्थ्यांचे, बेघर, हमाल, ट्रक ड्रायव्हर, रिमांड होममधील विद्यार्थी, ऊसतोड कामगार, करोना अलगीकरण कक्ष, विलगीकरण कक्ष,
ट्रॅव्हल हिस्ट्री, ओपीडीमधील रुग्ण, पोलीस, आरोग्य कर्मचारी वृध्दाश्रम, धर्मशाळा, सोसायटी कॉलनी, मागास क्षेत्र, वेश्या व्यवसाय, कारागृह, विटभट्टी व एमआयडीसी क्षेत्रातील काम करणारी कर्मचारी व मनोरुग्ण अशा 5 हजार लोकांचे मोफत कोवीड-19 आजारासाठी मानसिक समुपदेशन केले आहे. आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार केलेला आहे. मानसिक आरोग्य कक्षाची हेल्पालाईन सेवा नं 104 ही सेवा चोवीस तास सुरु आहे. यासाठी आरोग्य विभागाचे संचालिका डॉ. साधना तायडे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी भुपाल गिरीगोसावी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे.