ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसांगली

ऊसतोड मजुरांना मोठा दिलासा

जीवनावश्यक वस्तूंचे किराणा किट मोफत वाटप केले जाणार

ऊसतोडणी करून आलेल्या व होम क्वारंटाइन असलेल्या हजारो मजुरांना मिळणार लाभ

बीड जिल्हा परिषदेतून एक कोटी ४३ लाख रुपये निधी मंजूर

मुंबई : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ऊसतोडणी करून जिल्ह्यात परतलेल्या मजुरांसाठी महत्वपूर्ण व दिलासादायक निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या स्वनिधी मधून आता जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांना २८ दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीसाठी म्हणून जीवनावश्यक किराणा साहित्य मोफत वाटप करण्यात येणार आहे.

बीड जिल्हा परिषदेच्या स्वनिधी मधून यासाठी प्राथमिक स्वरूपात १ कोटी ४३ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, ग्रामविकास विभागाने यास विशेष बाब म्हणून तांत्रिक मान्यताही दिली आहे.

ऊसतोडणीसाठी गेलेल्या ऊसतोड मजुरांना राज्य शासनाने धनंजय मुंडे यांच्या सातत्यपूर्ण यशस्वी पाठपुराव्याने आपापल्या गावी परतण्यासाठी परवानगी दिली. त्यांना आपल्या गावी सुरक्षा व खबरदारीचा उपाय म्हणून २८ दिवसांसाठी अलगिकरणात ठेवण्यात येत आहे. अशावेळी त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची परवड होऊन जीवनावश्यक वस्तूंसाठी हाल होऊ नयेत या उद्देशाने ना. मुंडेंनी हा निर्णय घेण्याबाबत जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना निर्देशीत केले होते .

त्यानुसार जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या शिरसाठ , उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, इतर सभापती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी मागील चार दिवसांपासून याबाबत सखोल अभ्यास व प्रयन्त करून शासनाची विशेष बाब म्हणून धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून परवानगी मिळवली.

या निर्णयानुसार ऊसतोड मजुरांना तांदूळ, तूरडाळ, साखर, खाद्यतेल, मीठ, अंगाचा व कपड्याचा साबण, हळद, मिरची पावडर, मसाला, जिरे, मोहरी आदी साहित्याची किट मोफत देण्यात येणार आहे.

यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने १७ तारखेच्या शासन निर्णयानुसार अधिकृत नोंदणी करून परत आलेल्या ऊसतोड मजुरांची कुटुंब संख्या निश्चित करून, सदर चांगल्या प्रतीच्या किराणा मालाचा दर निश्चित करून त्या – त्या ग्रामपंचायतिला निधी वर्ग करण्यात येईल व ग्रामपंचायतीच्या मार्फत हे किराणा किट वाटप करण्यात येतील अशी माहिती जि. प. अध्यक्षा सौ शिवकन्या शिरसाट यांनी दिली.

दरम्यान राज्य ग्रामविकास विभागाने या निर्णयातील तांत्रिक बाबींना तात्काळ मान्यता दिल्याबद्दल ना. धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व विभागाचे आभार मानले आहेत.

तसेच कोणत्याही गावामध्ये किराणा किट वाटप करण्यावरून राजकारण होऊ नये किंवा अन्य अडचणी येऊ नयेत यासाठी दर चार गावांमध्ये एक विस्तार अधिकारी दर्जाचा क्षेत्रीय अधिकारी नेमून त्यांच्या नियंत्रणाखाली हे वाटप घरपोच करावे अशा सूचना ना. मुंडेंनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधितांना दिल्या आहेत.

आतापर्यंत नोंदणीकृत जिल्ह्यात आलेल्या तसेच अजूनही परत यायला सुरूच असलेल्या हजारो ऊसतोड मजुरांना या निर्णयाचा फायदा होणार असून पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार ग्रामपंचायत निहाय दर व कुटुंब संख्या निश्चित करून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा निधी ग्रामपंचायतींना वर्ग करण्यात येईल अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली.

धनंजय मुंडे – खरे पालक

करोनाच्या संकटामुळे सुरू झालेल्या लॉक डाऊन मध्ये धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील हजारो ऊसतोड मजुरांची सुरुवातीला ज्या ठिकाणी हे मजूर ऊस तोडणी करत आहे त्या ठिकाणी कारखान्याच्या माध्यमातून सोय केली .

लॉक डाऊन चा दुसरा फेज सुरू होताच त्यांना विशेष प्रयत्न करून जिल्ह्यात परत आणले आणि आता परत आल्यानंतर त्यांची जीवनावश्यक वस्तू अभावी हेळसांड होऊ नये म्हणून त्याची ही व्यवस्था करून खरे पालकत्व सिद्ध करून ऊसतोड मजुरांचे खऱ्या अर्थाने आशीर्वाद घेतले आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close