आगामी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो कोल्हापूर यांच्या वतीने योग प्रात्यक्षिके आणि योग प्रसार कार्यक्रम संपन्न

कोल्हापूरःअनिल पाटील
आंतरराष्ट्रीय योग दिनाला अवघे 39 दिवस उरलेले असताना केंद्र सरकारच्या माहितीआणि प्रसारण मंत्रालयांतर्गत क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो कोल्हापूरआणि राजाराम गार्डन हास्य योग क्लब यांच्या संयुक्त विद्यमानेआज कोल्हापुरातील राजारामपुरी येथे योग प्रात्यक्षिके, योगावरील व्याख्यान, प्रश्नमंजुषा अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या सर्व उपक्रमात योग अभ्यासक आणि साधक मोठ्या संख्येने सहभागी झाले . यावेळी योगविद्येबाबत सामान्य ज्ञानाची स्पर्धा देखील घेण्यात आली. या स्पर्धेला उपस्थितांचा उत्साही प्रतिसाद लाभला.
यावेळी बोलताना जायन्ट्स वेलफेअर फौंडेशनचे विभाग संचालक आणि योग अभ्यासक सुरेश खांडेकर म्हणाले की अवघ्या मानवजातीला वरदान ठरलेल्या अष्टांग योगसाधनेला आज पुन्हा महत्त्व प्राप्त झाले आहे. योगासन हे आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये संतुलन आणतात आणिआपल्याला प्रयत्न तसेच आत्मसमर्पण करायला शिकवतात. तणावातून मुक्त होण्यासाठी यातून खूप मदत मिळते. दैनंदिन जीवनामध्ये योगासन आणि योगमुद्रा यांचा अवलंब केला तर शरीर आणि मन कार्यरत ठेवायला मदत करतात म्हणून आपण सर्वांनी नियमित योगाभ्यास केला पाहिजे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचा प्रचार आणि प्रसार याला अत्यंत महत्त्व दिले असून माहिती प्रसारण मंत्रालयाचे विविध विभाग आज या अनुषंगाने योग दिनाविषयी लोकांमध्ये जनजागृती घडवून आणत आहेत. माहिती प्रसारण मंत्रालयाच्या पुणे येथील प्रादेशिक लोकसंपर्क कार्यालयाद्वारे असे कार्यक्रम महाराष्ट्र आणि गोव्यात आज ठीकठिकाणी आयोजित करण्यात आले असून आजचा हा क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो कोल्हापूर यांचा हा कार्यक्रम त्या प्रयत्नांचाच एक भाग आहे, असे यावेळी बोलताना दूरदर्शन कोल्हापूर केंद्राचे उपसंचालक संजय पेटकर म्हणाले.
यावेळी योगशिक्षक मीना शिंदे यांनी उपस्थितांना विविध आसनांची आणि त्यांच्या उपयुक्ततेची माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनअंतर्गत सर्वांनी योगासनांचा सराव केला.
कोल्हापूरमधील राजाराम गार्डन येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात वरिष्ठ नागरिक, महिला तसेच माहिती प्रसारण मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.