किती असतील असे अक्षय..?

Google+ Pinterest LinkedIn Tumblr +

सत्य लघुकथा

ते पावसाळ्याचे दिवस होते. एकसारखा पाऊस कोसळत होता.छोटी तळी, तलाव तुडूंब भरले होते .थोड्या वेळाने पावसाचा जोर ओसरला.झाडे वेळी न्हाऊन निघाली होती. शाळेचा समोरच असणाऱ्या पिंपळ वृक्षावरील पानांवर साठलेले पाणी हळुवार वाऱ्याने खाली टिपकत होते. झाडावर असणाऱ्या चिमण्यांच्या घरट्यातील पिल्ले बाहेर येऊन एकसारखा चिवचिवाट करत होती.

दुपारच्या जेवणाची सुट्टी झाली. मुले उडया मारतच बाहेर पडली. झाडावरून पडणाऱ्या पावसाच्या थेंब मुद्दामहून अंगावर झेलत होती. काही मुले साठलेल्या पाण्यात होडी सोडत होती. हात धुवून श्लोक म्हणून झाल्यावर मुले जेवायला बसली. तेवढ्यात एक टकटक करत घोडागाडी आली. शाळेचा समोरच एका घरासमोर असणाऱ्या मोकळ्या जागेत ती थांबली.वस्ती छोटी आसल्याने माणसं लगेच गोळा झाली. “घिसाडी आली, घिसाडी आली”मुलेच ओरडू लागली. गाडीतून कुटूंब खाली उतरले. तीस वर्षे वयाचा माणूस उंचापुरा रंगाने सावळा होता.त्यानंतर त्याची पत्नी गोरी एकदम सडपातळ, विस्कटलेले भोरे केस होते. अंगावर आखडलेली साडी होती. तिच्या गोऱ्या चेहऱ्यावरचे आडवे कुंकू फारच शोभत होते.तीन मुले अवतीभोवती फिरत होती. दोन मुले आणि एक मुलगी.मोठा मुलगा सावळा पण तब्येतीने दणकट होता. अंगावर मळकट कपडे होती. पण तो तरतरीत वाटत होता. मुलगी भोऱ्या केसांची, घाऱ्या डोळ्यांची नाकात सतत पाण्याची धार वाहणारी, छोटा मुलगा एकदम कृश वाटत होता.

घोडा एका जागेला बांधून सोबतचे साहित्य बाहेर काढू लागले. तोपर्यंत आम्ही सर्व मुले घंटा वाजताच वर्गात येऊन बसली. दुसऱ्या दिवशी मी शाळेत येताना पाहिलं की त्यांचा पाल ठोकून झालेला होता. बाहेर चूल मांडलेली होती. चुलीवर कालवण शिजत होतं. चार भांडीकुंडी, कापडं, एक पेटी,फाटकंतूटकं अंथरूण पडलेलं होतं. पालच्या बाहेर चार माणसं खुरपी, विळ्याला धार लावून घेण्यासाठी बसली होती तर काहीजण नवीन तयार करून दयायला लोखंडी वस्तू आणून देत होती. ती भाता चालवत होती आणि तिचा नवरा जोरजोरात घण मारत खुरप्याला आकार देत होता. लहान मूल सारखे आईजवळ पळत होतेआणि ती त्याला ओरडत होती.”अर अक्षा अक्कल कुठे गेली तुझी, की धगुरडा झालास रं घे की त्या पोराला सारखच पळतय.”तो मुलगा आपल्या भावाला ओढू लागला.रडणाऱ्या पोराला त्याने नुसता मोकळा भात खात बसलेल्या आपल्या बहिणीकडे नेले आणि तिच्या ताटातील थोडा भात तो त्याला भरवू लागला. तरी ते रडतच होतं.भात भरवत म्हणत होता “खा की मुकाट्यानं, रडू नकस म्या तुला आजीबरं जाऊन बाजारातून भारी घोडा आणीन”.

हळूहळू तो त्या दोन भावंडांना घेऊन शाळेकडे येऊ लागला.पण जवळ बोलावताच तो पळून जायचा. आणि परत येऊन उभा राहायचा. दुपारी जेवण्याच्या सुट्टीत इतर मुलांबरोबर त्याला आम्ही भात भाजी देऊ लागलो. तेंव्हा तो थोडा बोलायला लागला. मी त्याला विचारले” तुझे नाव काय?’तो लगेच म्हणाला मी “अक्षा, ही राधी आणि ह्यो विऱ्या”.मी त्याला म्हणाले तुझे नाव छानच आहे ‘अक्षय’.तो वर्गात येऊन चित्र काढणाऱ्या मुलांकडे कुतूहलाने पाहू लागला. मला म्हणाला “ही करत्याती व पोरं”?मी म्हणाले चित्र काढत आहेत. तो चित्र काढणाऱ्या मुलांजवळ बसताच मुले त्याच्यापासून दूर जाऊ लागली. आणि म्हणू लागली”मॅडम याने आंघोळ केली नाही,घाण वास येतोय याच्या अंगाचा.” मी त्याला जवळ बोलवून विचारले” तू कधी केली होतीस अंघोळ?” .त्यावर तो म्हणाला “त्या दिवशी पावसात”. मी त्याला म्हणाले “तू उदया अंघोळ करून शाळेत ये मी तुला छान वासाचा साबण आणून देते.” त्याने मानेने होकार दिला. दुसऱ्या दिवशी मी येण्याची वाट पाहताच तो रस्त्यावर उभा होता.साबण हातात देताच तो बादली घेऊन हातपंपावर गेला. बादलीत स्वतःच पाणी हापसून आधी स्वतःमग आपल्या भावंडाना आंघोळ घातली आणि आनंदाने शाळेत आला. मुलांना म्हणाला “आज मला वेगळं करायचं नाय म्या पण अंघोळ करून आलोया”.मुलांनी त्याला जवळ बसवून घेतले.तो उठून अधूनमधून आपल्या भांवडाकडे जायचा .त्यांना ओढत आणायचा “बस इथं गुमान”म्हणायचा पण ती लहान असल्याने सारखी फिरत राहायची.

पुस्तकातील पाठ शिकवताना तो काळजीपूर्वक ऐकायचा. लगेच मध्ये म्हणायचा मी बघितलंय हे या गावात, त्या गावात. तो त्याचे हुबेहूब अनुभव सांगायचा. मुले लक्ष देऊन ऐकायची.”त्याला टाळ्या वाजवायची. तो मनोमन आनंदायचा.मी त्याला दिलेल्या पुस्तकातील पानावरचे चित्र पाहून मला अनेक प्रश्न विचारायचा.ह्याच्यात काय आहे?याला काय म्हणत्याती?
त्याची शिक्षणाची ओढ पाहून मी त्याला पाटी, पेन्सिल ,चित्रकलेची वही, रंगीत खडू बॉक्स, आणि शाळेचा नवीन ड्रेस आणून दिला.
तो शाळेच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होता.त्याला या सर्व गोष्टी पहिल्यादा मिळाल्या होत्या.तो भारावून गेला होता. तो पळत आपल्या पालाकडे गेला.आईला बोटाला धरून ओढतच आणले.दिलेल्या सर्व वस्तू दाखवल्या. मी त्याच्या शाळेबद्दल आईला त्याचा शाळेबद्दल विचारताच त्या म्हणाल्या”गावाकडच्या शाळेत त्याचं नाव घातलया पण आम्ही आस गावोगाव फिरतो कशाची आलीया शाळा”.मी त्यांना निवासी शाळेत घालण्याचा सल्ला देताच त्या म्हणाल्या या पोरांना कोण सांभाळील ,काम नाय झालं तर पोटाला काय खावं, त्यात यांचा बा दारुडा हाय, दारूला पैसे उधळतो, मला आणि लेकरांना मारतो. कधी कधी उपाशी झोपावं लागतं.” मी निरुत्तर झाले काय बोलावे मला सुचतच नव्हते.

अक्षय रोज शाळेत येत होता. त्याला मुळाक्षरांची ओळख झाली होती. स्वतःचे नाव तो पाटीवर काढत होता. त्याची भावंडं शांत खेळावीत म्हणून मी बिस्किटे, चिरमुरे देऊन त्यांना गुंतवून ठेवत आसे.

तो एक दिवस तो माझ्याजवळ आला. मला म्हणाला “मी तुम्हांसनी काहीतरी देणार हाय डोळ मिटा बरं.”मी डोळे झाकले ,परत तो आता उघडा म्हणताच मी डोळे उघडले
त्याने एक खुरपे टेबलावर ठेवले”. म्या आणि आयनं केलंय तुम्हांसनी द्यायला. मला अक्षयच्या निरागस भावनेने भरून आले .मी त्या खुरप्याकडे पाहिले साध्या लाकडी दांडक्यात ते बसवले होते. त्यांची ती भेटवस्तू मी आनंदाने स्वीकारली.

असेच काही दिवस गेले. एक दिवस तो शाळेत आला नाही. मी त्याच्या पालाजवळ गेले तर अक्षय एकदम रडायला लागला. चार असणारी भांडीकुंडी सर्वत्र विखुरली होती.त्याच्या बापानं दारूला पैसा आई देत नाही म्हणून खूपच मारले होते. दोन छोट्या लेकरांना पदराखाली घेऊन ती माऊली रडत होती. मी त्यांची समजूत काढली पण त्यांचे आभाळाएवढे दुःखावर मी छोटी ठिगळं घालून काहीच उपयोग होणार नव्हता. मी आणि माझ्या सहकारी मॅडमनी आमचा डबा त्यांना खायला दिला. अक्षय म्हणत होता”मला लई शाळा शिकू वाटतयं, मला शाळेत येऊ द्या सांगा की आयला.”
मी त्याला म्हणाले बाळा उदया नक्की ये आज तुझ्या आईजवळ थांब.

मी जेंव्हा शालेत गेले तेंव्हा मला पाल दिसलाच नाही. माझ्या मनात एकदम धस्स झाले. मुलांनी अक्षय ती वस्ती सोडून गेल्याचे सांगितले. रात्रीच त्यांनी पाल गुंडाळून दुसरे गाव गाठले होते. मी त्या मोकळ्या जागेकडे पहाताच राहिले. तीन दगडाच्या चुलीशिवाय तिथे काहीच नव्हते.मी सुन्न झाले होते पण इलाज नव्हता.
आजही त्या खुरप्याकडे पाहून त्याची आठवण येते.मनात एक प्रश्न उभा राहतो. अजून किती असतील असे अक्षय..?

लेखिका-रंजना सानप
मायणी,

Share
Share.

About Author

Leave A Reply

या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये