*आनंदाचे अश्रू*

Google+ Pinterest LinkedIn Tumblr +

ती दिसायला काळीसावळी.उंच धिप्पाड पुरुषी बांध्याची .पण कष्टाळू आणि जिद्दी होती .शिक्षण दहावीपर्यंतच झालेलं. तिला शिक्षणाची आवड होती पण घरातून पुढच्या शिक्षणासाठी विरोध होता .घरात तीन मुली वयात आलेल्या होत्या. पण तारा मोठी आसल्याने तिला स्थळ बघणं सुरू झालं.येणार स्थळ तिच्या गुणाकडे न बघता तिच्या रूपाकडे बघून नकार द्यायच.ती उदास व्हायची. तिच्या इतर बहिणी तिची समजूत काढायच्या. “अगं आक्का एकदिवस राजकुमारसारखा मुलगा तुला पसंद करून घेऊन जाईल, रडतेस कशाला”.

खरं तर तेच घडलं.त्यांच्याच पाहुण्यातील एक स्थळ चालून आलं. मुलगा शिकलेला होता. दिसायला देखणा होता. पण घरची गरिबी होती. रोज मजुरी केल्याशिवाय त्याच्या घरची चूल पेटत नसायची. जमीन थोडीच पण पिकाऊ नव्हती. त्यांनी ताराला पसंद केले. घरातील लोकांनी मग फारसा विचार न करता तिचे लग्न थोड्याच माणसात एका मंदिरात लावून दिले.

ती एका छोट्या कौलारू घरात सासरी आली. दोनच खोल्या असणारे ते घर.पाऊस आला की टीपकणारं पाणी साठवण्यासाठी घरभर भांडी मांडावी लागायची. सासू सासरे दुसऱ्याच्या शेतात कामाला जायचे. तिचा नवरा एका खाजगी बँकेत कारकून म्हणून काम करायचा. महिना फ़क्त दोन तीन हजार पगार भेटायचा. कांता घरची शेती, जनावरे दिवसभर सांभाळायची. नवे नवलाईचे दिवस संपले.

बघता बघता कांता तीन मुलांची आई झाली. दोन मुली आणि एक मुलगा. घरातील खाणाऱ्या माणसांची तोंडे वाढली. कधी कधी उपासमारीची वेळ येऊ लागली. मुलांना ,सासुसासऱ्यांना आधी खाऊं घालून तारा व तिचा पती जेवण करायचा. पण ती परिस्थितीला कधी दोष देत बसायची नाही. तिच्या काळासावळा चेहरा नेहमी फुललेला असायचा.तिच्या तोंडी एकच वाक्य असायचं”हे पण दिवस जातील”.

मुले शाळेत जाऊ लागली.तसा तिने शिवण क्लास केला. दिवसा घरशेतातील काम उरकून रात्रीची ती शिवणकाम करू लागली. मुलांना चांगले शिक्षण द्यायचे हा निर्धार तिने मनाशी केला होता. ती मुलांचा अभ्यास घ्यायची. त्यांच्या शाळेत जाऊन शिक्षकांना भेटायची.त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल चर्चा करायची.तिच्या या गोष्टीच शिक्षकांनाही कौतुक वाटायचं.रात्रीच्या वेळी तीन लेकरांना जवळ घ्यायची त्यांच्या अंगावरून हात फिरवत म्हणायची.” खूप शिका बाळानू, आईबाबांच्या वाट्याला जे कष्ट आलं ते तुम्हाला नको.”आणि तिचं डोळ पाण्यानं भरून जायचं. तीन मुलं आईच्या डोळ्यांतील टिपकणाऱ्या थेंबाकडे पहायची आणि खूप शिकुन आईचं स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी धडपडायची .त्यांना घराच्या परिस्थितीची जाणीव होती. कोणताही हट्ट ती आईवडिलांकडे करायची नाहीत.मिळेल त्या गोष्टीत ती समाधान मानायची.

तीनही मुले शाळेत हुशार होती. आई शेतातून घरी येण्याच्या आधी घरातील कामे उरकुन तीअभ्यासाला बसायची. वडीलही मुलांना मार्गदर्शन करायचे. मोठी मुलगी बीफार्म झाली. तीला एका कंपनीत नोकरी मिळाली. दुसरी मुलगी इंजिनिअर झाली. तिलाही पाहिल्याचं प्रयत्नांत नोकरी लागली. छोटा मुलगा विजय दहावीत होता. मोठ्या दोन बहिणी आता भावाच्या शिक्षणाकडे लक्ष देत होत्या.घरची परिस्थिती थोडी बदलली होती. मुलींनी जुन्या घरात बदल करून घेतला होत्या. मातीं शेणाने सारवायाच्या भिंती आता सिमेंटच्या झाल्या होत्या. गळणाऱ्या कौलारू घरावर पत्रा बसवला होता. तारा गाईला चारा घालत आसताना विजयच्या हायस्कुलमधील पाच सहा शिक्षक अचानक घरी आले.ती सुरवातीला भांबावून गेली. मुख्याध्यापकनी तारा विजय व त्याच्या वडिलांच्या हातात पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. विजय दहावी बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांकानी उत्तीर्ण झाला होता. ताराचा आनंद आता गगनात मावत नव्हता. तिने मनी धरलेले स्वप्न पूर्ण झाले होते.

विजयही काही वर्षातच इंजिनिअर होऊन पुण्यात एका कंपनीत रूजू झाला. अनेक लोकांची आता तिच्या घरी ये जा वाढली. अनेकजणी मुलांच्या शिक्षणाचा सल्ला घेण्यासाठी तिच्याकडे येऊ लागल्या. ती आपल्या भाषेत त्यांना योग्य तो सल्ला देऊ लागली.

अचानक मोठ्या मुलीचा फोन आला आम्ही तिघेही दोन दिवसासाठी गावी येतोय. तिला ते कशासाठी येत आहेत याची कल्पना नव्हती. उगीचच तिच्या मनात हुरहुर लागली. “का बरं अचानक गावी येणं केलं असेल?”
तिन्ही मुले संध्याकाळी घरी पोहचली. त्यांचा हातात काहीतरी दिसत होते. एका बॉक्स मध्ये केक तर दुसऱ्या पिशवीत कपडे होती. वाडीलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ती गावी आली होती. घरच्या परिस्थितीमुळे उभ्या आयुष्यात त्यांना वडिलांचा वाढदिवस साजरा करता आला नव्हता. तो आनंद आज त्यांचीच मुले त्यांना देत होती. वडिलांनी बावीस वर्षे सायकलवरूनच आठ नऊ किलोमीटरवरची नोकरी केली. साधी मोटारसायकल घेणे त्यांना जमले नव्हते. आज मुलांनी आपल्या वडिलांना नविकोरी मोटारसायकल वाढदिवसानिमित्त भेट दिली. दोघांनाही आणलेली कपडे घालून औक्षण केले.यावेळी तारा आणी तिच्या पतीच्या तोंडून शब्द फुटत नव्हते फ़क्त डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. ‘फक्त आनंदाश्रू’.

लेखिका-रंजना सानप
मायणी

Share
Share.

About Author

Leave A Reply

या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये