खाजगी हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी कोविड-19 संशयित रूग्ण डेडीकेटेड कोविड हॉस्पीटलला तात्काळ पाठवावा : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

0

सांगली : खाजगी हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी कोविड-19 च्या अनुषंगाने स्वत:बरोबरच स्टाफची काळजी घ्यावी. रूग्ण हाताळताना आवश्यक त्या सर्व उपाययोजना करून खबरदारी घ्यावी. रूग्णांनी मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन आदि गोष्टींचे कटाक्षाने पालन करण्याबाबत दक्षता घ्यावी. एखादा रूग्ण कोविड संशयित वाटल्यास त्याला विहीत पध्दतीचा अवलंब करून डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलला तात्काळ पाठवावे. यामध्ये कोणत्याही प्रकारे विलंब करू नये. त्याचबरोबर सदर रूग्णाची माहिती पब्लिक हेल्थ ॲथॉरिटीला तात्काळ द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.
कोविड-19 च्या अनुषंगाने जिल्ह्यातील खाजगी हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी त्यांच्या हॉस्पीटलमध्ये घ्यावयाची खबरदारी या विषयांवर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांच्यासह जिल्ह्यातील डॉक्टर्स उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, हेल्थ केअर वर्कर्सनी योग्य पध्दतीने पीपीई घालणे आवश्यक आहे. रूग्णंची हॉस्पीटलमधील हालचाल मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. रूग्णांचा प्रतीक्षा कालावधी कमीत कमी ठेवण्यासाठी प्रयत्न करा. प्रोसिजर रूममध्ये गर्दी टाळावी. इन्स्ट्रुमेंटच्या डेडिकेटेड सेटचा वापर करावा. एखाद्या रूग्णाची तपासणी केल्यानंतर इन्स्ट्रुमेंटचे निर्जुंतीकरण करूनच पुन्हा त्याचा वापर करावा. हॉस्पीटलमध्ये घ्यावयाच्या काळजीबाबत वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांपर्यंत प्रशिक्षण द्यावे. संशयित रूग्ण पॉझिटीव्ह आहे असे गृहित धरूनच सर्व काळजी घ्यावी. कोविड रूग्ण कोविड हॉस्पीटलला पाठविताना त्याची माहिती पब्लिक हेल्थ ॲथॉरिटीला देण्याबरोबरच तो रूग्ण कोविड हॉस्पीटलला पोहोचला याची खातरजमा करावी. कंटेनमेंट झोन लगतच्या हॉस्पीटलनी अधिकची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी कोविड-19 च्या अनुषंगाने जिल्ह्यातील डॉक्टरांनी त्यांच्या हॉस्पीटलमध्ये घ्यावयाची खबरदारी, करावयाच्या उपाययोजना व उपचार पध्दती विषयी सविस्तर सादरीकरण केले. वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्या स्टाफच्या हालचालीवर बारकाईने लक्ष द्यावे. एखादा स्टाफ सुट्टीवरून आला असेल तर कोविडच्या अनुषंगाने त्याची खातरजमा करूनच ड्युटीवर घ्यावे. स्वॅब टेस्टच्या बाबतीत एक्सपोझर कालावधीचे लक्षात घेणे आवश्यक आहे. फेसमास्क, हॅण्ड हायझीन, सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करावे. कोविडचा प्रादुर्भाव पसरूनये यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे आवाहनही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी डॉक्टरांनी उपस्थित केलेल्या विविध शंकांंचे निरसन केले.

Share
Share.

About Author

Leave A Reply

या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये