बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू व उत्पादनांचे मिरज, सांगली व शिराळा येथे विक्री प्रदर्शन
सांगली : ग्रामीण भागातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) सांगली मार्फत बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू व उत्पादनांसाठी विक्री प्रदर्शन तसेच महिला मेळावा दि. 14, 15, 16 व 17 फेब्रुवारी 2024 या चार दिवसांकरिता सुख निवास हॉल मिरज रेल्वे स्टेशन मिरज येथे आयोजित केला आहे. या विक्री प्रदर्शन व मेळाव्याचे उद्घाटन कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते दि. 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता होणार आहे, अशी माहिती माविम चे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुदंन शिनगारे यांनी दिली.
तसेच दिं. 15 ते 18 फेब्रवारी पर्यंत वेलणकर हॉल, राम मंदिर कॉर्नर, सांगली येथे विक्री प्रदर्शन व महिला मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याचे उद्घाटन आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते दि. 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता होणार आहे. दि. 17 ते 20 फेब्रुवारी पर्यंत एस. टी. बस स्थानक ग्राऊंड शिराळा येथे विक्री प्रदर्शन व महिला मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याचे उद्घाटन आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते होणार आहे.
प्रत्येक ठिकाणी आयोजित विक्री प्रदर्शनात ग्रामीण भागातील 30 बचत गट स्टॉल सहभागी होणार आहेत. या विक्री प्रदर्शन व मेळाव्यास जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देवून लाभ घ्यावा, असे आवाहन माविम चे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुदंन शिनगारे यांनी केले आहे.