सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत मनाई आदेश जारी

0

अंत्यविधी व लग्नसमारंभाकरिता 50 व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई

सांगली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून राज्य शासनाने दिनांक 19 मे 2020 च्या आदेशान्वये राज्यातील लॉकडाऊन कालावधी 31 मे 2020 पर्यंत वाढविला आहे. त्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत दिनांक 22 मे 2020 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दिनांक 31 मे 2020 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार जिल्ह्यातील वय वर्षे 65 वरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, 10 वर्षाखालील बालके व आजार असणाऱ्या व्यक्ती (persons with co-morbidities) यांना अत्यावश्यक गरजा व वैद्यकीय सेवा वगळता घरातून बाहेर पडण्यास मनाई केली आहे. सदर कालावधीत अंत्यविधीकरिता 50 व लग्नसमारंभाकरिता 50 व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई केली आहे. शासन निर्देशाप्रमाणे सदर ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक राहणार आहे.
तसेच जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडील आदेश क्र. गृह-1/कार्या-6/एमएजी-1/बं.आ./एसआर-16/2020 दिनांक 4 मे 2020 अन्वये 19.00 वाजल्यापासून ते 07.00 वाजेपर्यंत अत्यावश्यक नसलेल्या कारणांसाठी सर्व व्यक्तींच्या संचारास मनाई करण्यात येत आहे, असा पारित करण्यात आलेला बंदी आदेश कायम ठेवण्यात आला आहे. सदर आदेशाची अंमलबजावणी पोलीस विभागाने तंतोतंत करावयाची आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.
जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडील दिनांक 3 मे रोजीच्या आदेशान्वये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये पारित करण्यात आलेला आदेश व सदर आदेशास दिनांक 17 मे च्या आदेशान्वये देण्यात आलेली मुदतवाढ रद्द करण्यात आली आहे व वरीलप्रमाणे नव्याने आदेश पारित करण्यात आला आहे.
या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्याकामी सांगली जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी / कर्मचारी यांना या आदेशाव्दारे प्राधिकृत करण्यात आले असल्याचे, जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

Share
Share.

About Author

Leave A Reply

या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये