ताज्या घडामोडी

सांगली जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 साठी 471 कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता  

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक : सांगली जिल्हा खासदार, आमदार, अधिकारी उपस्थित

 

 

 

        सांगली : राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 साठी एकूण 471 कोटी 1 लाख रूपयांच्या प्रारूप आराखड्यास आज मान्यता देण्यात आली. यामध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) साठी 385 कोटी, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमसाठी 85 कोटी आणि आदिवासी उपयोजना बाह्य घटक कार्यक्रम साठी 1 कोटी 1 लाख रूपये निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) करिता रु. 150 कोटीची जादा मागणी उपमुख्यमंत्री (नियोजन) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 11 जानेवारी रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीत करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस या बैठकीस खासदार संजय पाटील, आमदार अरूण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अनिल बाबर, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुमनताई पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, महापालिका आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, सन 2023-24 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) योजनेतून 405 कोटी रूपये नियतव्यय मंजूर आहे. त्यापैकी रक्कम रूपये 284 कोटी प्राप्त असून, 213 कोटी रूपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 45 टक्के निधी वितरीत करण्यात आला आहे. उर्वरित कामांच्या प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही 15 दिवसांत पूर्ण करावी व मार्च 24 अखेर निधी खर्च करावा. याचे कटाक्षाने पालन करावे. कोणताही निधी परत जाणार नाही, याची दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 (सर्वसाधारण) करिता स्थानिक स्वराज्य संस्थांकडील आर्थिक व भौतिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करण्यात आलेल्या निधीमधून प्रशासकीय मान्यता दिलेली कामे तात्काळ पूर्ण करून निधी खर्च करण्याचे आदेश यावेळी डॉ. खाडे यांनी दिले. तसेच, टेंभू, ताकारी व म्हैसाळ उपसा सिंचन योजनेंतर्गत भूसंपादनाचा प्रलंबित मोबदला अदा करण्यातील अडचणी दूर करण्यासाठी तालुकानिहाय बैठक घेण्याचे यावेळी निर्देश देण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी एस. टी. महामंडळाच्या फेऱ्यांची संख्या वाढवण्याबाबत स्वतंत्र बैठक घेण्याचे यावेळी निर्देशित करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल व स्मार्ट पीएचसी या उपक्रमांचे राज्य मंत्रीमंडळ बैठकीत कौतुक करण्यात आले असून, दोन्ही उपक्रम अजून गतीने राबवावेत, असे त्यांनी यावेळी सूचित केले. या माध्यमातून शाळांमध्ये चांगल्या सुविधा निर्माण होऊन, ग्रामीण भागातील गुणवान विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळेल. ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी चालू आर्थिक वर्षातील डिसेंबरपर्यंतच्या खर्चित निधीचा आढावा घेण्यात आला. 20 ऑक्टोबर रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समिती सभेचे इतिवृत्त व त्यावरील कार्यवाहीच्या अहवालास मान्यता देण्यात आली. तसेच, प्रस्ताव प्राप्त झालेल्या यात्रास्थळांना “क” वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता देण्यात आली.

या बैठकीत मौजे फार्णेवाडी (ता. वाळवा)  व मौजे निगडी बु. (ता. जत) येथे आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली या संस्थेस सी. टी. स्कॅन मशीन विथ ऑल अक्सेसरीज व टर्न की सिस्टीम खरेदीसाठी रु. 10.50 कोटी इतक्या रकमेस  शासनाकडून दि. 9 जानेवारी रोजी सुधारीत प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली असून जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधून निधी उपलब्ध करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरजमध्ये एमआरआय मशिन करिता रु. 25 कोटी इतक्या रकमेस शासनाकडून  दि. 9 जानेवारी रोजी प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली असून जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधून सन 2023-24 व सन 2024-25 मध्ये निधी उपलब्ध करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण मधून तर सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी अनुसूचित जाती उपयोजनामधून सन 2023-24 मधील कामांची व डिसेंबर 2023 अखेर खर्चित निधीची माहिती सादरीकरणातून दिली.

यावेळी लोकप्रतिनिधी आणि जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी विविध विषय मांडले. रस्ते विकास, पाणी, ग्रामीण भागातील रस्ते, अंगणवाडी व शाळा खोल्यांची दुरूस्ती, मुख्यमंत्री सौर कृषि योजना, ग्रामीण रूग्णालयांचा प्रस्ताव, अपूर्ण पुलांची कामे, ट्रान्सफॉर्मरसाठी निधी उपलब्धता, सभामंडप, ग्रामपंचायतीच्या मालकीचे मंगल कार्यालय, बसफेऱ्या, महावितरणची देयके, पर्यटन विकास, तीर्थक्षेत्र विकास आदि विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

प्रारंभी दिवंगत माजी आमदार प्रा. शरद पाटील यांना श्रद्धाजंली वाहण्यात आली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने क्रीडांगण विकास अनुदान योजनाअंतर्गत पलूस नगरपरिषदेने सादर केलेल्या प्रस्तावानुसार पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते राष्ट्रीय रायफल शूटर वैष्णवी विजय सूर्यवंशी हिच्या वडिलांना रक्कम रूपये पाच लाख किंमतीचे पिस्टल प्रदान करण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!