आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

नवभारत साक्षरता कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा :  प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

सांगली : नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ज्यांचे अद्यापही स्कूल युजर आयडी तयार केले नाहीत, ते 29 डिसेंबरअखेर तयार करावेत. 15 वर्षे व त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तिंची नोंदणी तात्काळ करून घ्यावी, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज येथे दिल्या.

केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणी संदर्भात नियामक परिषद व कार्यकारी समितीच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेत झालेल्या या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास) संदीप यादव, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगलीचे प्राचार्य रमेश व्हसकोटी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड, शिक्षणाधिकारी (योजना) महेश धोत्रे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत यांच्यासह समिती सदस्य व सर्व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.

प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत चालू शैक्षणिक वर्षात मागील वर्षीचे 11 हजार 458 व चालू वर्षाचे 12 हजार 479 असे एकूण 24 हजार 137 उद्दिष्ट पूर्ण करावयाचे आहे. हे उद्दिष्ट संबंधित यंत्रणांनी पूर्ण करावे. जिल्हा शंभर टक्के साक्षर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. अंगणवाडी ताई व आशा वर्कर यांची निरक्षर व्यक्तिंचा सर्व्हे करण्यासाठी मदत घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

प्राचार्य रमेश व्हसकोटी म्हणाले, तालुका व गाव पातळीवर बैठका घेवून या कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती द्यावी. शाळा ही या योजनेच्या अंमलबजावणीसाठी एकक असल्यामुळे शिक्षकांनी निरक्षर व्यक्तिंची नोंदणी करून घ्यावी. निरक्षर व्यक्तिंच्या नोंदणीनंतर स्वयंसेवकांकडून निरक्षर व्यक्तिंच्या अध्यापनाचे कामकाज करण्यात येईल. शिक्षकांना फक्त मॉनिटरींग करावे लागणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी शिक्षणाधिकारी (योजना) महेश धोत्रे यांनी नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत झालेल्या कामाची सविस्तर माहिती दिली. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड यांनी आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!