महाराष्ट्र

भारतात चित्रिकरण करणाऱ्या परदेशी चित्रपट निर्मिती संस्थांना दिला जाणारा प्रोत्साहनपर निधी ;2.5 कोटी रुपयांची मर्यादा वाढवून ती 30 कोटी : केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर


’75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ साठी भरती मोहिमेची घोषणा

54 व्या इफ्फीसाठी सर्वसमावेशकता ही मार्गदर्शक भावना राहिली आहे

इफ्फी 40 उल्लेखनीय महिला चित्रपट निर्मात्यांचे चित्रपट प्रदर्शित करणार

गोवा (अभिजीत रांजणे);

आपल्या सिनेमाचं भारतात चित्रिकरण करणाऱ्या परदेशी चित्रपट निर्मिती संस्थांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनपर निधीत वाढ करून ती चित्रिकरणासाठी येणाऱ्या खर्चाच्या 40% इतकी केली जाईल अशी घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी केली आहे. गोव्यात पणजी इथे होत असलेल्या  54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी ही घोषणा केली. यासाठीची यापूर्वीची मर्यादा वाढवून ती 30 कोटी रुपये (3.5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त) केली जाईल असेही त्यांनी सांगितले. यापूर्वी, प्रत्येक प्रकल्पासाठीच्या प्रोत्साहनाची मर्यादा केवळ 2.5 कोटी रुपये होती. यासोबतच ज्या सिनेमांमध्ये भारताशी संबंधीत महत्त्वाचा आशय [Significant Indian Content (SIC)] असेल अशा चित्रपटांसाठी अतिरिक्त 5%  निधी बोनस म्हणून दिला जाईल अशी घोषणाही  त्यांनी केली.

ठाकूर म्हणाले की, भारताचे आकारमान  आणि इथली अफाट क्षमता लक्षात घेता मध्यम आणि मोठ्या बजेटच्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पांना देशात आकर्षित करण्यासाठी अधिक सवलत देण्याची गरज होती.  “चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सवलतीत केलेली वाढ कलात्मक अभिव्यक्तीप्रती  भारताच्या वचनबद्धतेचा आणि पाठिंब्याचा दाखला आहे आणि चित्रपट निर्मितीसाठी एक पसंतीचे ठिकाण म्हणून आमची भूमिका  अधिक बळकट करते ” असे ते पुढे म्हणाले.

सुप्रसिध्द अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या वैभवशाली कारकिर्दीचा गौरव करत 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये तिला ‘भारतीय चित्रपटांतील योगदानाबद्दल विशेष सन्मान’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे, “दीर्घ काळ गाजवलेले एक आयकॉनिक व्यक्तिमत्त्व म्हणून माधुरी दीक्षित हिने गेली चार दशके तिच्या अतुलनीय प्रतिभेने आपल्या भारतीय चित्रपटांना शोभा आणली आहे.”

यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी ’75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ मध्ये निवडलेल्या युवकांसाठी  भरती मोहिमेची घोषणा केली, ज्यामुळे त्यांच्या बहरलेल्या प्रतिभेसाठी  आणि कारकीर्दीसाठी अमर्याद संधी खुल्या होतील.  ’75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ चे यंदा तिसरे वर्ष असून युवकांना त्यांची सर्जनशील अभिव्यक्ती सिनेमाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेतून 2021 मध्ये याची सुरुवात झाली. “या वर्षी, 10 श्रेणींमध्ये सुमारे 600 प्रवेशिका आल्या , त्यापैकी  75 युवा  चित्रपट निर्माते 19 राज्यांमधून निवडण्यात आले , यामध्ये बिष्णुपूर, जगतसिंगपूर आणि सदरपूर सारख्या दुर्गम भागांचा समावेश आहे”, असे ते पुढे म्हणाले.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी यंदाच्या इफ्फी (IFFI) मध्ये पुरस्कारांच्या श्रेणीत पहिल्यांदाच समाविष्ट करण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (ओटीटी) या नवीन श्रेणीची घोषणा केली. महोत्सवातील नवीन गोष्टींवर प्रकाश टाकत ते म्हणाले की, भारतातील आशय संपन्न साहित्य निर्मिती करणाऱ्या कलाकारांनी रोजगार निर्मिती आणि नवोन्मेष, यासाठी दिलेलं योगदान लक्षात घेत, त्यांच्या परिवर्तनशील भूमिकेला इफ्फी मध्ये मान्यता दिली जाईल आणि त्यांचा गौरव केला जाईल. ते म्हणाले, “सिनेजगत आणि माहितीपट विभागातील नवोन्मेष प्रदर्शित करून, नॉन-फिक्शन स्टोरीटेलिंग, अर्थात वास्तववादी कथा कथनाला प्रोत्साहन देण्यासाठी अद्ययावत ‘VFX आणि टेक पॅव्हेलियन’ चे आयोजन करून, इफ्फिने प्रथमच फिल्म बाजार उपक्रमाची व्याप्ती वाढवली आहे.”

महिला सक्षमीकरणासाठी भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, यंदाच्या इफ्फीमध्ये 40 महिला चित्रपट निर्मात्यांचे उल्लेखनीय चित्रपट दाखवले जातील. “त्यांची प्रतिभा, सृजनशीलता आणि असामान्य दृष्टीकोन, या महोत्सवात विविध गटांचे आणि आशयाचे प्रतिनिधित्व करेल.”.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्राद्वारे सर्वसमावेशक आणि सर्वांना प्रवेश देणाऱ्या भारताच्या निर्मितीवर सातत्याने भर दिला आहे. पंतप्रधानांचा हा दृष्टीकोन पुढे नेत, इफ्फी ने सर्वसमावेशकतेला मार्गदर्शक तत्त्व बनवून ‘सबका मनोरंजन’ म्हणजेच ‘सर्वांसाठी मनोरंजन’ याचा पुरस्कार केला आहे, यावर त्यांनी भर दिला. “यंदाच्या महोत्सवातील सर्व आयोजन स्थळे दिव्यांग जनांसाठी सोयीसुविधांनी सुसज्ज असतील.

दृष्टी आणि श्रवणदोष असलेल्या प्रतिनिधींसाठी एम्बेडेड ऑडिओ वर्णनासह, चित्रपटांची चार अतिरिक्त विशेष स्क्रीनिंग्ज आयोजित केली जातील”, असे ते पुढे म्हणाले.

एकत्रित आणणारी  शक्ती म्हणून सिनेमाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करताना  ठाकूर यांनी सांगितले की,  “चित्रपटाचा संपूर्ण इतिहास जर पाहिला तर चित्रपटाने   कल्पना, कल्पनाशक्ती आणि नवोन्मेष  अशा प्रकारे पकडला  आहे आणि त्याला अशाप्रकारे त्याला पैलू पाडले आहेत की, चित्रपट हे  दुहीमुळे अधिकाधिक व्यथित होत असलेल्या जगात शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी प्रेरक शक्ती ठरतात, यावर माझा ठाम विश्वास आहे.”

भारतातील प्रसारमाध्यम  आणि मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी अलीकडच्या काळात भारत सरकारने केलेल्या अनेक उपाययोजनांना देखील  अनुराग सिंह ठाकूर यांनी स्पर्श केला.  “अलीकडेच, माननीय पंतप्रधान, नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली, सिनेमॅटोग्राफ (सुधारणा) विधेयक, 2023 ला लोकसभा आणि राज्यसभा या दोन्हीं सदनांकडून मंजुरी मिळाली आहे. हा कायदा केवळ कायदेशीर चौकटच विस्तृत करत नाही, तर कॉपीराईट संरक्षणाचा समावेश करण्यासाठी सेन्सॉरशिपच्या पलीकडे लक्ष केंद्रित करतानाच  पायरसीविरूद्ध कठोर उपाय देखील प्रदान करतो,असे त्यांनी सांगितले .

सर्वांना एकत्र बांधणारा धागा म्हणून चित्रपटांची असलेली भूमिका अधोरेखित करत केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर म्हणाले, “चित्रपट क्षेत्राच्या इतिहासात, चित्रपटांनी विविध संकल्पना,  कल्पना आणि नवोन्मेष यांचे अशा प्रकारे चित्रण आणि विश्लेषण केले आहे की त्यातून  विभाजनाच्या वाढत्या त्रासाला सामोरे जाणाऱ्या जगात शांतता, प्रगती आणि समृद्धी यांच्यासाठीची प्रेरक शक्ती तयार झाली आहे.”

कलाकारांच्या द्रष्ट्या कार्यातून निर्माण झालेल्या वैज्ञानिक शक्यतांचा संबंध भारताच्या यशस्वी चंद्रयान-3 मोहिमेशी जोडताना केंद्रीय मंत्री म्हणाले, “वर्ष 1902 मध्ये म्हणजे अवकाश संशोधनाची कल्पना जन्माला येण्याच्या किंवा त्याची कल्पना करण्याच्याही कितीतरी आधी जॉर्जेस मेलीस यांच्या ‘अ ट्रीप टू द मून’ या फ्रेंच चित्रपटाच्या रूपातील कलेच्या द्रष्ट्या आविष्काराने त्या दिशेने वैज्ञानिक शक्यतांची आणि प्रगतीची बीजे लोकांच्या मनात रोवली.” केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर म्हणाले, “चित्रपटांमध्ये अतुलनीय सामर्थ्य आहे आणि त्यातील संकल्पना ज्या प्रकारे आपल्या जगाला आकार देतात ते पाहणे अत्यंत रोमांचक आहे.”

2023 च्या  प्रतिष्ठित सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झालेल्या   हॉलिवूड अभिनेते /निर्माते  मायकेल डग्लस यांचे अनुराग सिंह  ठाकूर यांनी अभिनंदन केले. त्यांनी   इंडियन पॅनोरमा, सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (ओटीटी) आणि उद्याचे  75 सर्जनशील प्रतिभावंत या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या  प्रतिष्ठित परीक्षकांचेही मनापासून आभार मानले.

आपल्या भाषणाचा समारोप करताना मंत्री म्हणाले की,  इफ्फीसाठीचा  त्यांचा  दृष्टीकोन  केवळ एका कार्यक्रमापुरता  मर्यादित नाही, तर जेव्हा आपण अमृत महोत्सवातून अमृत काळामध्ये  संक्रमण करत आहोत आणि  भारत जेव्हा स्वातंत्र्याची  100 वे वर्ष साजरी  करेल तेव्हा इफ्फी कशाप्रकारे असावा, हा दृष्टोकोनही यामागे आहे, असे ते म्हणाले.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!