महाराष्ट्र

कुशल मनुष्यबळ निर्मितीतून रोजगार देणारा कौशल्य, उद्योजकता विभाग

 

सध्याच्या घडीला भारत हा जगातील सर्वाधिक तरूणांचा देश आहे. तरूणाईच्या हाताला काम देऊन बेरोजगारीवर मात करण्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग काम करत आहे. या माध्यमातून युवाशक्तीला योग्य दिशा आणि मार्गदर्शनाची जोड दिली जाते. या विभागाच्या योजनांची माहिती आजच्या लेखात घेण्यात आली आहे.

जिल्ह्यातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या मागणीनुसार कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन कुशल मनुष्यबळ निर्माण करणे तसेच युवकांच्या नाविन्यपूर्ण नवसंकल्पनांना वाव देण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे, हे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे उद्दिष्ट आहे. तसेच, उद्योजकांशी समन्वय साधून त्यांची नोंदणी केली जाते व त्यांच्या मागणीनुसार प्रशिक्षित कुशल उमेदवार पुरवले जातात. बेरोजगार उमेदवारांची नोंदणी केली जाते व त्यांना नोकरी मिळविण्यासाठी मार्गदर्शन व सहाय्य तसेच व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन केले जाते.

विभागाच्या पोर्टल वरुन उमेदवारांना ऑनलाईन नाव नोंदणी, नोंदणीचे नूतनीकरण, पात्रतेत वाढ, पत्ता बदल इत्यादि करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उद्योजकांना रिक्त पदे अधिसूचित करणे, विवरण पत्र भरणे इ. सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेत.

या विभागामार्फत विविध कौशल्य विकास योजना राबविल्या जातात. केंद्र व महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यात विविध क्षेत्रात कौशल्य प्रदान करून उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगारक्षम बनविण्यासाठी व महाराष्ट्र राज्यात कौशल्य विकास सोसायटी मार्फत नियोजन, समन्वय, अंमलबजावणी आणि देखरेख करण्यासाठी विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. त्यामध्ये प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY) केंद्र पुरस्कृत राज्य व्यवस्थापित, प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान – PMKUVA, किमान कौशल्य विकास कार्यक्रम (जिल्हा नियोजन समिती निधीतून), पूर्व कौशल्य ज्ञान मान्यता (RPL)  SANKALP –  Skill Acquisition and knowledge Awareness Livelihood Promotion या योजनांचा समावेश आहे.

रोजगार मेळावे : ही योजना नियोक्ते आणि नोकरी शोधणाऱ्यांसाठी असून, उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि कोणत्याही शुल्काशिवाय नियोक्त्याला योग्य उमेदवार उपलब्ध करून देण्यासाठी नियोक्ता आणि नोकरी शोधणाऱ्यांना एकाच छताखाली आमंत्रित करणे.          रोजगार मेळाव्यातून उमेदवारांना अनेक उद्योजकांकडे एकाच ठिकाणी मुलाखतीची संधी प्राप्त होते व उद्योजकांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची उपलब्धता करुन देण्यात येते.

रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम (Employment Promotion Programme) : ही योजना सामान्यतः ‘ईपीपी’ म्हणून ओळखली जाते. रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम (EPP) ही खाजगी क्षेत्रातील आस्थापना/ उद्योगांमध्ये नोकरी शोधणाऱ्यांना त्यांची कौशल्ये सुधारण्यासाठी आणि त्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी On job Training  देण्याची योजना आहे. ही योजना नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली. या प्रशिक्षणासाठी किमान १० वी उत्तीर्ण आणि १८ वर्षे व त्यावरील वयाचे उमेदवार पात्र आहेत. प्रशिक्षण कालावधी सहा महिने असतो.

व्यवसाय मार्गदर्शन कक्ष सध्या राज्याच्या  रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये व्यवसाय मार्गदर्शन कक्ष आहे. तेथे आवश्यक ते साहित्य, पुस्तके, माहिती पत्रके इ उमेदवारांना उपलब्ध असतात. त्यांना वेगवेगळ्या रोजगाराबद्दल मार्गदर्शन दिले जाते. स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त केले जाते.

मॉडेल करिअर सेंटर : जिल्ह्यातील रोजगार इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी, तंत्रज्ञानाचा वापर करुन उमेदवारांना व्यवसाय मार्गदर्शन, समुपदेशन आणि प्रशिक्षण उपलब्ध करुन देणे. उमेदवारांची मूल्यमापन चाचणी (वर्तणूक, मानसशास्त्रीय, कौशल्य, कल इ. चाचणी) घेणे, समुपदेशन करुन रोजगार/ स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणेबाबत सहाय्य करणे. तज्ञ व्यक्तिंमार्फत व्यवसाय मार्गदर्शन केले जाते.

उद्योजकता बाबत योजना : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना केली आहे. त्यामार्फत स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांना स्वयंरोजगाराबाबतची माहिती, मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य केले जाते.

अधिक  माहितीसाठी  संपर्क – 0233-2990383.

 

                                                      

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!