ग्रामीण

वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी आपले काम प्रमाणिकपणे करून पर्यावरण व निसर्गाची उत्तम प्रकारे सेवा करावी :  प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. सुनिता सिंग

कुंडल वन प्रबोधिनीत वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांचा दिक्षांत समारंभ संपन्न

 

                                       

 

        सांगली  :      वन परिक्षेत्र अधिकारी हे वन विभागाचा कणा आहेत. नवोदित अधिकाऱ्यांनी आपले काम अत्यंत सक्षमपणे व प्रमाणिकपणे करून पर्यावरण व  निसर्गाची उत्तम प्रकारे सेवा करावी,  असे केल्यास बदलत्या काळातील आव्हाने सहज पेलता येतील, असे प्रतिपादन  महाराष्ट्र राज्य सामाजिक वनीकरण प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. सुनिता सिंग यांनी केले.

भारत सरकारच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाद्वारे कुंडल वन प्रबोधिनी येथे दि.१६ ऑगस्ट २०२१ ते १५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांचा नवव्या प्रशिक्षण सत्राचा दिक्षांत समारंभ कुंडल वन प्रबोधिनीमध्ये येथे १५ फेब्रुवारी २०२३ रोजी संपन्न झाला. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य वनसंरक्षक (शिक्षण व प्रशिक्षण) एन.आर. प्रविण, मुख्य वनसंरक्षक (प्रा.) कोल्हापूर आर.एम. रामानुजम, उपवनसंरक्षक सांगली नीता कट्टे, कुंडल वन प्रबोधिनी महासंचालक जे.पी. त्रिपाठी, संचालक व सत्र संचालक डॉ. शैलेंद्रकुमार जाधव, सहायक वनसंरक्षक रुपाली सावंत, सामाजिक वनीकरण विभागीय वन अधिकारी विजय काळे आदि उपस्थित होते.

वृक्ष लागवडीबरोबरच वन जमीनीवरील अतिक्रमणांपासून वन जमिनींचे संरक्षण करणे काळाची गरज असल्याचे मुख्य वनसंरक्षक (शिक्षण व प्रशिक्षण) एन.आर. प्रविण यांनी सांगितले.

वन सेवा ही निसर्गाची, पर्यावरणाची सेवा करण्याची मोठी संधी असल्याचे व या वसुंधरेवरील नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षणाची जबाबदारी वन अधिकाऱ्यांची व सर्वांचीच असून अतिक्रमणांपासून वनांचे संरक्षणासाठी वन कर्मचारी यांची टीम करून त्यांचे समवेत वन भ्रमंती करणे गरजेचे असल्याचे मुख्य वनसंरक्षक (प्रा.), कोल्हापूर आर.एम. रामानुजम यांनी सांगितले.

प्रास्ताविकात महासंचालक जे.पी.त्रिपाठी यांनी आपल्या भारत सरकारच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाच्या अधिनस्थ  संचालक, वन शिक्षण, डेहराडून यांच्याकडून आयोजित करण्यात येत असलेल्या वन परिक्षेत्र अधिकारी पदासाठीच्या या शिक्षणाबाबत तसेच प्रबोधिनीमध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या विविध प्रशिक्षणांबाबत माहिती दिली. ही प्रबोधिनी देशातील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था असल्याचे त्यांनी नमूद केले.  वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या या तुकडीमध्ये केरळ राज्यातील 21, उत्तर प्रदेशातील 15 व आंध्र प्रदेशातील 9 असे एकूण 45 प्रशिक्षणार्थी असल्याचे नमूद करून, अठरा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केलेले हे वनपरिक्षेत्र अधिकारी आगामी काळात वने, पर्यावरण, हवामान बदल व इतर पर्यावरणीय समस्यांचा समर्थपणे मुकाबला करण्यास सज्ज असतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रबोधिनीचे संचालक व सत्र संचालक डॉ. एस.बी.जाधव यांनी निकाल जाहीर केला. वन परिक्षेत्र अधिकारी राधा कुमारी, बिनु पाल, देविका संघमित्रा, रोहित जोशी, सुशील मिश्रा यांनी मनोगत व्यक्त केली. , वन परिक्षेत्र अधिकारी, उत्तर प्रदेश रोहित जोशी हे सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या प्रसंगी Flora of Kundal Forest Academy  व  Journey from Kundal A Tale of Untold  या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

 

प्रारंभी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या पासिंग आऊट परेडचे संचलन प्रबोधिनीच्या मैदानावर झाले. त्यानंतर या अधिकाऱ्यांसाठी स्टार ओपनिंग समारंभ संपन्न झाला. सूत्रसंचालन रुपाली सावंत, सहायक वनसंरक्षक यांनी तर आभार प्रदर्शन संचालक डॉ. शैलेंद्रकुमार जाधव  यांनी केले.

या कार्यक्रमास सेवानिवृत्त मुख्य वनसंरक्षक डी.डी.गुजेला, सेवानिवृत्त वन अधिकारी माणिक भोसले, रामदास पुजारी, सुखदेव खोत व वनविभागाचे इतर अधिकारी तसेच केरळ, उत्तर प्रदेश व आंध्र प्रदेश या राज्यांतून मोठ्या संख्येने आलेले प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचे पालक आदि उपस्थित होते.

 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!