ताज्या घडामोडी

आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर : पालकमंत्री जयंत पाटील

१४ प्राथमिक आरोग्य केंद्रांना रूग्णवाहिकांचे लोकार्पण

सांगली : : कोरोनाची दुसरी लाट आता सुरू झाली असून कोरोनाचा संसर्ग वाढू नये व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन मधून निधी देण्यात येईल. आज १४ रूग्णवाहिकांचे आरोग्य केंद्रांना लोकार्पण होत असून आणखी नविन १६ रूग्णवाहिका देण्यात येतील, अशी ग्वाही जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.

माधवनगर रोड येथील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन येथील लक्ष्मणराव किर्लोस्कर सभागृहात जिल्हा परिषदेच्यावतीने कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य विषयक सरपंच कार्यशाळा व १४ व्या वित्त आयोगातून मिळालेल्या १४ रूग्णवाहिकांच्या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, आरोग्य व शिक्षण सभापती आशा पाटील, समाज कल्याण सभापती प्रमोद शेंडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिकत्‍ मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि.) राहुल गावडे, उपमुख्य कार्यकारी (ग्रामपंचायत) तानाजी लोखंडे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता राज्य शासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. राज्य शासन याबाबत सजग असून कोरोना वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करीत आहे. गर्दीमुळे कोरोना वाढतो असा अनुभव आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यास आठवडी बाजार, गर्दीची ठिकाणे याबाबत कठोर निर्णय घेण्यात येतील. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कोरोनासाठी भरीव तरतूद केली असून सर्वाधिक निधी आरोग्यावर खर्च करण्यात येणार आहे. आरोग्य सुविधा देण्यात राज्य शासनाकडून सांगली जिल्ह्याला झुकते माप दिले आहे. जिल्ह्यासाठी नविन रूग्णालयेही मंजूर केली आहेत, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा असाव्यात यासाठी १४ वा व १५ वा वित्त आयोग यातून मिळणारा निधी सरपंचांनी आरोग्य यंत्रणेवर खर्च करावा. निधीचे योग्य प्रकारे नियोजन व्हावे. तसेच कोरोना काळात सरपंचांनी योग्य प्रकारे भूमिका बजावावी. यासाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे या कार्यशाळेत ज्या उपाययोजना सांगितल्या जातील त्याची आपल्या गावात योग्य प्रकारे अंमलबजावणी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यापुढील काळात पालकमंत्री या नात्याने जिल्हा परिषदेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहून ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी जास्तीत जास्त निधी जिल्हा परिषदेला देण्यात येईल असे ते म्हणाले.

सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, कोरोनाशी लढण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. जनतेनेही कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनास सहकार्य केले पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी जाणे जनतेने टाळावे. कोरोनावर मात करण्यासाठी लोकप्रतिनिधींनीही या लढ्यात सक्रीय सहभागी व्हावे. यासाठी प्रबोधनावर जास्तीत जास्त भर द्यावा. लोकांनी बेफिकिरपणे न वागता स्वयंशिस्त पाळली पाहिजे. जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सक्षम करीत आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतींना विविध योजना, आयोग याकडून येणाऱ्या निधीचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. या निधीमध्ये आरोग्य यंत्रणेला सक्षम करण्यासाठी जास्तीत जास्त निधी दिला पाहिजे, असे सांगून सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, राज्य शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या संकल्पनेचा स्वयंस्फूर्तीने स्वीकार करून कोरोना रोखण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत “मी जबाबदार” ही संकल्पना आत्मसात करावी.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सद्यस्थितीमध्ये बेफिकीरपणाचे प्रमाण वाढले असून कोरोना विषयक नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. आता कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असून दिवसेंदिवस कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या वाढत आहे. यासाठी राज्य शासनाकडून अनेक कठोर निर्बंध अंमलात आणण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली आहे. कोरोना रोखण्यासाठी ग्रामीण भागात सरपंचांची भूमिका ही महत्वाची आहे. गावाच्या भल्यासाठी ग्रामस्तरावरील दक्षता समितीने गावात कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. जनतेनेही मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे या त्रिसुत्रीचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी सरपंचांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना कसा करावा याबाबत मार्गदर्शन करून सरपंचांना योग्य प्रशिक्षण मिळावे यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याचे सांगितले. या कार्यशाळेत दक्षता समितीचे कार्य, गृह विलगीकरण, जनजागृती, कोविड मॅनेजमेंट, आठवडी बाजार किंवा गर्दीची ठिकाणे यांचे नियोजन, धार्मिक स्थळे, लसीकरण, कोविड तपासणी याबाबतचे सविस्तर सादरीकरण केले.

प्रास्ताविक शिक्षण व आरोग्‍य सभापती आशा पाटील यांनी केले. दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र मांगले, रांजणी, भिलवडी, देशींग, कामेरी, खंडेराजुरी, शिरसी, येडेमच्छिंद्र, आटपाडी, कोत्यांवबोबलाद, वळसंग, आगळगाव, बिळूर आणि येळवी यांना रूग्णवाहिकेंचे प्रदान पालकमंत्री जयंत पाटील व सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याहस्ते करण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close