ताज्या घडामोडी

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेशांचे काटेकोर पालन करा : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : राज्यातील वाढती कोरोना रूग्ण संख्या पाहता गर्दीच्या ठिकाणी निर्बंध कडक करण्याचे आदेश राज्य शासनाकडील दि. 15 मार्च 2021 रोजीच्या आदेशान्वये देण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती पहाता जिल्हाधिकारी यांना प्राप्त असलेल्या अधिकारानुसार सांगली जिल्ह्यात पुढीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले आहेत. तरी सदर आदेशाचे संबंधित यंत्रणांनी तसेच जनतेने काटेकोरपणे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

प्रतिबंधात्मक आदेश पुढीलप्रमाणे आहेत. सर्व सिनेमा हॉल / हॉटेल्स/रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेसह पुढील अटी व शर्तीच्या अधीन राहून सुरू राहतील तसेच मॉल्सनाही पुढील आदेश लागू राहतील – योग्य पध्दतीने मास्क परिधान केल्याशिवाय प्रवेश करण्यास परवानगी नसेल. प्रवेश देते वेळी ताप मापक यंत्राने ताप नसल्याबाबतची खात्री करणे बंधनकारक असेल. विविध सोयीस्कर ठिकाणी पुरेसे हॅण्ड सॅनिटाईझर ठेवणे बंधनकारक असेल. अभ्यागतांना मास्क परिधान करणे व सोशल डिस्टन्सींग लागू करण्यासाठी पुरेशा मनुष्यबळाची व्यवस्था असणे बंधनकारक असेल. याशिवाय सर्व मॉल्सना वरील आदेशाव्यतिरिक्त मॉल व्यवस्थापकांनी मॉल्स मधील थिएटर/रेस्टॉरंट तसेच इतर आस्थापना या आदेशाव्दारे अथवा इतर कोणत्याही अस्तित्वात असणाऱ्या आदेशाव्दारे त्यांना घालून दिलेल्या निर्बंधांचे / अटी व शर्तीचे पालन करीत असल्याबाबतची खात्री करावी.

राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम प्रतिबंधित असतील. फक्त लग्न कार्यासाठी 50 व्यक्तींच्या मर्यादेत एकत्र येण्यास परवानगी असेल.

या आदेशाचे उल्लंघन झाल्यास केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड-19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल, तितक्या कालावधीसाठी संबंधित सिनेमा हॉल, हॉटेल्स, रेस्टॉरंट, मॉल बंद केले जातील तर  मालमत्ता बंद ठेवल्या जातील.  सदर आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित आस्थापनेच्या मालकाकडून आपत्ती कायद्याने निश्चित करण्यात आलेल्या दंडाची आकारणी व कायदेशीर कारवाई केली जाईल.

अंत्यसंस्कारासाठी 20 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध असेल. सदर बाबीचे पालन होते अगर कसे याची पडताळणी करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराजय संस्थेची असेल.

गृह अलगीकरणास पुढील निर्बंधांसह परवानगी असेल – गृह अलगीकरण होणारी व्यक्ती ज्या वैद्यकीय व्यावसायिकाच्या पर्यवेक्षणाखाली उपचार घेणार आहे त्याची माहिती स्थानिक वैद्यकीय अधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्था यांना देणे संबंधितावर बंधनकारक असेल. ज्या ठिकाणी कोव्हीड-19 रूग्ण गृह अलगीकरण झाला आहे, त्या ठिकाणी दरवाजावर / दर्शनी भागावर सदर बाबतचा फलक रूग्ण कोव्हीड-19 बाधित म्हणून आढळून आलेल्या दिवसापासून 14 दिवस लावण्यात यावा. कोव्हीड-19 रूग्णास गृह अलगीकरणाचा शिक्का मारण्यात यावा. कोव्हीड-19 रूग्णाच्या कुटुंबास शक्यतो बाहेर न पडावे तसेच मास्क परिधान करणे बंधनकारक असेल. कोव्हीड-19 रूग्णाने गृह अलगीकरणाचे कोणतेही उल्लंघन केल्यास तात्काळ त्याची रवानगी संस्थात्मक अलगीकरणाच्या ठिकाणी करण्यात येईल.

या व्यतिरिक्त यापूर्वी आदेशाने बंदी अथवा सूट देण्यात आलेल्या क्रिया / बाबी कायम राहतील. सूट देण्यात आलेल्या आस्थापनांनी, शासनाने त्या-त्या विभागासाठी / आस्थापनांसाठी नेमून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील. सदर आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, Incident Commander तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी. हा आदेश दिनांक 31 मार्च 2021 रोजीचे रात्री 12 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close