सांगली

कोविड-19 लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी यंत्रणा सुसज्ज ठेवा : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : जिल्ह्यात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात होत असून पहिल्या टप्प्यात ग्रामीण व शहरी अशा 9 ठिकाणी तर महानगरपालिका क्षेत्रात 8 ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी शासन निर्देशानुसार आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध ठेवा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
कोविड-19 लसीकरण जिल्हा समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रदीप दिक्षीत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, महानगरपालिका उपायुक्त राहुल रोकडे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल आंबोळे, जिल्हा समन्वयक डॉ. विवेक पाटील आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 10 तालुक्यांमध्ये 13 हजार 354 तर सांगली महानगरपालिका क्षेत्रातील 13 हजार 138 अशा एकूण 26 हजार 492 वैद्यकीय क्षेत्रातील लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. या सर्व लाभार्थ्यांना COWIN ॲपच्या माध्यमातून त्यांच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर लसीकरणासाठीचा दिनांक व वेळ याबाबतची माहिती देण्यात येणार आहे. तरी लाभार्थ्यांनी याबाबत दक्ष राहून कळविण्यात आलेल्या ठिकाणी, दिलेल्या तारखेला व वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. लसीकरणासाठी येताना संबंधित लाभार्थ्यांनी शासनमान्य ओळखपत्र सोबत आणावे. जे लाभार्थी ओळखपत्र म्हणून आधार कार्डचा वापर करणार आहेत अशांनी त्यांचा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक करून घेणेही आवश्यक आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
लसीकरणाच्या ठिकाणी शासनाने निर्देशित केल्या प्रमाणे सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे सांगताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, लसीकरणाच्या ठिकाणी अभ्यागत कक्ष, लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्षाची सुविधा उपलब्ध ठेवावी. त्याप्रमाणेच बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, महिला व दिव्यांग यांच्यासाठीही सुलभता असावी. लसीकरणाच्या ठिकाणी तातडीने वैद्यकीय सुविधेची निकड भासल्यास जवळच्या रूग्णालयांची निवड करून ठेवण्यात यावी. प्रत्येक लसीकरण सेंटरमध्ये 1 रूग्णवाहिका उपलब्ध ठेवावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close