शासकीय, खाजगी रूग्णालयांचे फायर, इलेक्ट्रीकल, स्ट्रक्चरल ऑडिट 15 दिवसात पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : भंडारा जिल्ह्यात शासकीय रूग्णालयातील भीषण आग प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मा. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी रूग्णालयांचे फायर, इलेक्ट्रीकल व स्ट्रक्चरल ऑडिट 15 दिवसात पूर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय व खाजगी रूग्णालयांचे फायर, इलेक्ट्रीकल व स्ट्रक्चरल ऑडिट बाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रदीप दिक्षीत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, महानगरपालिका उपायुक्त राहुल रोकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. जी. मिसाळ, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल आंबोळे, महानगरपालिका चिफ फायर ऑफिसर चिंतामणी कांबळे, महानगरपालिका विद्युत अभियंता अमरसिंह चव्हाण, विद्युत निरीक्षक श. मा. कोळी, सहाय्यक विद्युत निरीक्षक अ. बा. माने आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, प्रत्येक जीव अनमोल आहे. निष्पाप जीव बळी जाऊ नयेत यासाठी यंत्रणांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज व पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय, सांगली यांचे फायर ऑडिट महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने करून त्याबाबतच्या असणाऱ्या त्रुटी, आवश्यक असणारी साधनसामग्री याबाबतचा अहवाल तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागास सादर करावा. आरोग्य व सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाच्या मार्फत शासनास तातडीने सादर करावा. तसेच विद्युत निरीक्षकांनी फायर सेफ्टीचे इतर सर्व रूग्णालयांचे ऑडिट करून त्याबाबतचा अहवाल द्यावा, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, फायर सेफ्टी ऑडिट करताना प्राधान्यक्रम ठरवावा. यामध्ये प्रामुख्याने रूग्णालयातील अतिदक्षता विभाग (आयसीयु), लहान बालकांचे विभाग, गंभीर आजारांचे रूग्ण विभाग येथील ऑडिट प्राधान्याने करावे. तसेच आग लागण्याच्या कारणांचाही सखोल अभ्यास करण्यात यावा. यामध्ये आरोग्य विभागाने त्यांच्याकडे उपलब्ध असलेली आरोग्य विषयक उपकरणे, शासनमान्य संस्थांकडून तपासणी करून घ्यावीत. उपकरणांचेही ऑडिट तातडीने करून घ्यावे.
विद्युत निरीक्षकांनी शासकीय सर्व रूग्णालये यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय, सिव्हील हॉस्पीटल तसेच उपजिल्हा रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांचे इलेक्ट्रीकल ऑडिट करून संबंधित विभागांना त्याबाबतचा अहवाल सादर करावा. विद्युत निरीक्षकांकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार आरोग्य व बांधकाम विभागाने पुढील कार्यवाही करून याबाबतचे परिपूर्ण प्रस्ताव संबंधित विभागांना सादर करावेत. तातडीच्या ठिकाणी जिल्हा नियोजनकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल.
जिल्ह्यातील खाजगी रूग्णालयांनी त्यांचे फायर ऑडिट ते ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रात आहेत (महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका/नगरपंचायत) त्यांच्याकडून करून घेण्यात यावे. तसेच इलेक्ट्रीकल ऑडिट संबंधित रूग्णालयांच्या समित्यांकडून स्वप्रमाणित (self certfified) करून घ्यावे. खाजगी रूग्णालयातील या दोन्हीही यंत्रणा अद्ययावत व सुस्थितीत ठेवाव्यात. याबाबतचीही कार्यवाही तातडीने करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.
प्रशासकीय विभागनिहाय प्रशिक्षणाचे आयोजन करा
आग लागलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन यंत्रणा प्रसंगाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत त्याचा मोठा प्रसार होऊ नये यासाठी प्रशासकीय कार्यालयातील अग्निरोधक यंत्रणा अद्ययावत करण्यात यावी. कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना अग्निरोधक उपकरणे योग्य रितीने हाताळता यावीत यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालयाने त्यांच्या वेळ मर्यादेनुसार प्रशिक्षीत संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात यावे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, आग लागलेल्या आपत्कालीन परिस्थिती कशा प्रकारे हाताळावी यासाठी रंगीत तालीमांचे (मॉक ड्रील) वेळोवेळी घेण्यात यावे. मॉक ड्रील करताना प्रशिक्षीत अथवा प्रमाणित संस्थाकडून त्यांचे आयोजन करण्यात यावे. अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण व रंगीत तालीम (मॉक ड्रील) आयोजित केल्याचा अहवाल सादर करण्यात यावा.
याबाबतची कार्यवाही संबंधितांनी तातडीने सुरू करावी. या संबंधात कोणत्याही विभागाने निष्काळजीपणा व हलगर्जीपणा करू नये अथवा अनास्था दाखवू नये, अशा सूचनाही त्यांनी शेवटी दिल्या.