अल्पसंख्याकांच्या योजना तळागाळापर्यंत पोहचणे आवश्यक
अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त आयोजित वेबीनारमधील सूर

सांगली, दि. 18: भारतीय राज्यघटनेतील मूल्यांचा प्रत्येक समाज घटाकांनी अंगीकार केला पाहिजे .अल्पसंख्याकांच्या योजना तळागाळापर्यत पोहचणे आवश्यक आहे. अल्पसंख्याकांच्या संस्थाचा विकास होणे आवश्यक आहे असे मत अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वेबीनार मध्ये सहभागी झालेल्या वक्तांनी मांडले.
अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन सहभागात्मक वेबीनार आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे-चौगले, सहायक आयुक्त समाज कल्याण अर्जुन बन्ने, यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेबीनार मध्ये राजगोंडा पाटील यांनी अल्पसंख्याक युवक, युवती आत्मनिर्भर होण्यासाठी त्यांच्यातील कौशल्य विकसीत करणे आवश्यक आहे असे सांगितले. डॉ. विनोद पवार यांनी अल्पसंख्याकांचे संविधानाचे हक्क याविषयी बोलताना सामाजिक शांतता सुव्यवस्था आणि सामाजिक आरोग्य अबाधित राहिल याची जाणीव ठेवून अल्पसंख्याकांनी आपले हक्क वापरावेत. विज्ञान निष्ठ दृष्टीकोन, चिकित्सक वृत्तीचा अंगीकार करावा. अल्पसंख्याक समाजाने कायम अल्पसंख्याक म्हणून न राहता मुख्य प्रवाहात समाविष्ठ होणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. अशिष कच्छी यांनी यावेळी बोलताना धर्म निरपेक्षता हे भारतीय राज्यघटनेचे मूलभूत वैशिष्टे असून कायद्यासमोर सर्व समान आहे. सामाजिक समतोल राखण्याची गरज असून विचारांना विधायक वळण लावणे व समाजातील उणीवा दूर करण्यासाठी अल्पसंख्याक समाजतील घटकांनी प्रयत्न करावेत असे मत व्यक्त केले. के.जी. पठाण यांनी संविधानाने प्रत्येक नागरिकाला सामाजिक, अर्थिक विकास साध्य करण्याचा हक्क दिला आहे असे सांगितले. या वेबीनारमध्ये अल्पसंख्याक घटकातील अनेक सदस्य ऑनलाईन सहभागी झाले होते.
महिला लोकशाही दिन सोमवारी
सांगली : पीडित व अन्यायग्रस्त महिलांच्या न्यायासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी राज्यस्तरीय व विभागीय स्तर, तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय व चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. ऑक्टोबर महिन्याचा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन दिनांक 21 डिसेंबर 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी दिली.