सांगली

सांगली जिल्ह्यात पदवीधरसाठी 64.60 टक्के मतदान

शिक्षक मतदारसंघासाठी 81.43 टक्के मतदान प्रशासनाने व्यक्त केला प्राथमिक अंदाज

सांगली, दि. 1  : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2020 साठी सांगली जिल्ह्यात आज झालेले मतदान हे कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडले. यामध्ये जिल्ह्यात पदवीधरसाठी 64.60 टक्के तर शिक्षक मतदारसंघासाठी 81.43 टक्के इतके मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला.
गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाच्या टक्केवारीत भरीव वाढ झाल्याचे निदर्शनास आले. जिल्ह्यातील पदवीधर मतदारसंघासाठीच्या 143 व शिक्षक मतदारसंघासाठीच्या 48 मतदान केंद्रावर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. प्रारंभी मतदानाची टक्केवारी कमी होती. मात्र दुपारनंतर ती वाढली. सन 2014 च्या पदवीधर निवडणुकीत केवळ 29.82 टक्के तर शिक्षक मतदारसंघासाठी 61.96 टक्के इतके मतदान झाले होते. यावेळी गतनिवडणुकीच्या तुलनेत मतदान मोठ्या संख्येने झाले आहे. मतदान प्रक्रिया शातंतेत पार पडल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले.
पदवीधर मतदारसंघासाठी 62 तर शिक्षकसाठी 35 उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यातील 14 तर शिक्षक मतदारसंघासाठी 5 उमेदवारांनी कौल मागितला आहे. मतदान प्रक्रियेसाठी महसुल यंत्रणा, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग तसेच इतर शासकीय विभाग कार्यरत राहिले. दिनांक 3 डिसेंबर गुरुवार रोजी पुणे येथे मतमोजणी होणार आहे. मतदानाचा वाढलेला टक्का कोणाच्या गळ्यात आमदारकीची माळ घालणार याकडे सांगलीकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यात एकूण 87 हजार 233 मतदार होते यातील 56 हजार 354 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर शिक्षक मतदारसंघासाठी जिल्ह्यात एकूण 6 हजार 812 मतदार होते. यातील 5 हजार 547 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची अंतिम टक्केवारी सर्व मतदान पार्टी मतपेटी स्वीकृत केंद्रात पोहचल्यानंतर फॉर्म 16 व Presiding Officer डायरी यांचा ताळमेळ घेतल्यानंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

सर्व मतदान केंद्रावर व्हिडीओग्राफी करण्यात आली. या वेबकास्टिंग प्रणालीचे मॉनिटरिंग स्वत: जिल्हाधिकारी यांनी केले. त्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या कक्षात यंत्रणा उभारण्यात आली. निवडणुक साहित्याची वाहतूक होणाऱ्या प्रत्येक वाहनावर जीपीएस प्रणाली बसविण्यात आली. तिचे मॉनिटरिंगही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या कक्षातून करण्यात आले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close