ताज्या घडामोडी

निवडणुका अत्यंत पारदर्शकपणे आणि शांततेत पार पाडाव्यात: निवडणूक निरीक्षक श्रीकांत देशपांडे

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक निवडणूक

सांगली, दि. 26 : पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक निवडणुकी करता काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असून मतदान प्रक्रियेत काम करणाऱ्या जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी चोख पार पाडावी, यात हायगय होता कामा नये तसेच आदर्श आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही याची दक्षता घेऊन या निवडणुका अत्यंत पारदर्शकपणे आणि शांततेत पार पाडाव्यात, कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायांवर भर द्यावा, अशा सूचना शिक्षक मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक श्रीकांत देशपांडे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवडणूक तयारीचा आढावा श्रीकांत देशपांडे यांनी घेतला यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मारूतीराव बोरकर, मिरजेचे प्रांताधिकारी डॉ. समीर शिंगटे उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकारी श्री. चौधरी यांनी या निवडणुकीच्या अनुषंगाने संगणकीय सादरीकरण करुन जिल्ह्यातील तयारीचा आढावा सादर केला.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोविड-१९ च्या अनुषंगाने मतदान केंद्राचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. तसेच मतदान प्रक्रियेसाठी काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर देण्यात येणार आहे. जिल्ह्यात या निवडणुकीकरिता १९१ मतदान केंद्रे असून त्यापैकी पदवीधरांसाठी १४३ तर 48 शिक्षक मतदान केंद्रे कार्यरत असल्याचे सांगितले. तसेच या 191 मतदान केंद्रावर सुमारे 422 आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्याचे सांगून मिरजसाठी सर्वाधिक 10 तर पलूससाठी सर्वात कमी म्हणजे 2 निवडणूक मतदान केंद्रे उभारण्यात आले आहेत तसेच शिक्षक निवडणूक मतदारसंघासाठी सांगली जिल्ह्यातील सुमारे 6812 इतके मतदार असल्याची माहिती दिली. तर पोलीस अधीक्षक श्री. गेडाम यांनी या निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याची माहिती दिली.
आढावा बैठकीनंतर निवडणूक निरीक्षक श्रीकांत देशपांडे यांनी सांगलीतील शांतिनिकेतन महाविदयालय, श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय या ठिकाणच्या निवडणूक केंद्राची पहाणी करुन मिरजेतील शासकीय धान्य गोदाम येथे निवडणुकीच्या अनुषंगाने ठेवण्यात आलेल्या साहित्याचे पाहणी केली. तसेच या निवडणुकीकरिता प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या तयारी बद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी तहसीलदार दगडू कुंभार यांच्यासह निवडणुक विषयक कामकाज पाहणारे इतर अधिकारी उपस्थित होते.
—————————-

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ – मतदानाचा हक्क
बजावण्यासाठी विशेष नैमित्तीक रजा मंजूर

सांगली : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या द्ववार्षिक निवडणूक 2020 चा कार्यक्रम घोषित झाला आहे. सदर निवडणूकीचे मतदान मंगळवार दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायकांळी 5 पर्यंत होणार असून मतमोजणी गुरूवार दिनांक 3 डिसेंबर 2020 रोजी होणार आहे. या निवडणूकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजाविता येण्यासाठी मतदानाच्या दिवसाची विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्याचे मा. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून निर्देश प्राप्त आहेत. मतदानासाठी देण्यात आलेली रजा ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार आहे. सदरची रजा महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई कडील शासन निर्णय क्रमांक – विनेर,2011/प्र.क्र.146/का-29 दिनांक 23 जून 2011 अन्वये अनुज्ञेय असणार आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close