क्षयरूग्ण व कुष्ठरूग्ण शोध अभियान 1 डिसेंबरपासून : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
सांगली, दि. 25 : कोरोना महामारीमुळे जिल्ह्यातील कुष्ठरूग्ण व क्षयरूग्ण शोधाचे प्रमाण अत्यल्प असून त्यामध्ये सुधारणा करण्याकरिता राज्यस्तरावरून जिल्ह्यामध्ये दि. १ ते १६ डिसेंबर २०२० या कालावधीमध्ये संयुक्त सक्रीय क्षयरूग्ण शोध मोहिम व कुष्ठरूग्ण शोध अभियान राबविण्याबाबत सुचना प्राप्त झाल्या आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
या अभियानाचे उद्दिष्ट समाजातील कुष्ठरूग्ण व क्षयरूग्णांचे लवकरात लवकर निदान करून त्यांना औषधोपचाराखाली आणणे, संसर्गाची साखळी खंडीत करून होणारा प्रसार रोखणे व समाजामध्ये क्षयरोग व कुष्ठरोगाबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करणे हा आहे. सांगली जिल्ह्यामध्ये सध्यस्थितीत एकूण 1527 क्षयरूग्ण उपचार घेत आहेत. या रूग्णांना निक्सय पोषण योजनेंतर्गत दरमहा 500 रूपये प्रमाणे औषधोपचार कालावधीकरीता लाभ देण्यात येत आहे. तसेच दि. 1 एप्रिल 2020 ते आजअखेर जिल्ह्यामध्ये 39 कुष्ठरूग्णांचे निदान झाले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.
सांगली जिल्ह्यामध्ये संयुक्त सक्रीय क्षयरूग्ण शोध मोहिम व कुष्ठरूग्ण शोध अभियान राबविण्याकरिता ग्रामीण भागातील 100 टक्के (23 लाख 10 हजार 289) व शहरी भागातील 30 टक्के (2 लाख 18 हजार 122) इतक्या लोकसंख्येचे सर्व्हेक्षण आशा स्वयंसेविका व पुरूष स्वयंसेवक यांच्या पथकामार्फत केले जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागाकरीता 1822 व शहरी भागाकरिता 125 पथके नेमण्यातआली आहेत. गृहभेटीमध्ये कुटुंबातील महिला सदस्यांची तपासणी आशा स्वयंसेविकांनी व पुरूष सदस्यांची तपासणी पुरूष स्वयंसेवकांमार्फत करण्यात येणार आहे. तरी या पथकातील गृहभेटीसाठी येणाऱ्या सदस्यांना जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.