मोदींच्या कार्पोरेट मित्रांना फायदा : आ. पृथ्वीराज चव्हाण
कोल्हापूर : दी सरकारने घाई गडबडीत तीन शेतकरी विरोधी कृषी विधेयके मंजूर करून घेत लोकशाहीचा गळा घोटला आहे. हे शेतकऱ्यांना गुलामगिरीत लोटणारे विधेयक असून, मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांनाच याचा फायदा होणार आहे. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकार हे सूट-बूटवाल्यांचे सरकार आहे. असा घणाघात करत हे विधेयक संशोधनासाठी संसदीय समितीकडे पाठवावे, असा आमचा आग्रह होता.
राष्ट्रीय काँग्रेसच्या सूचनेवरून व प्रदेश काँग्रेसच्या सहयोगाने आज राज्यभर केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयकावर आवाज उठवण्यासाठी शेतकरी बचाओ व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत राज्यातील 10 हजार गावे सहभागी झाली होती. यामध्ये सातारा, सांगली व कोल्हापूर विभागातून आ. चव्हाण यांनी कोल्हापूर येथून रॅलीस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, ना. सतेज पाटील, ना. विश्वजित कदम, आ. पी. एन. पाटील, आ. ऋतूराज पाटील, आ. राजूबाबा आवळे, कोल्हापूरच्या महापौर निलोफर आजरेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.