ताज्या घडामोडी

क्रिमिन कोंगो हेमोरेजिक फिवर रोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुपालकांनी विशेष खबरदारी घ्यावी – जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस. एस. बेडक्याळे

सांगली, दि. 7: गुजरात राज्यातील बोताड व कच्छ या जिल्ह्यांमध्ये क्रिमिन कांगो हेमोरेजिक फिवर (CFF) या रोगाचा प्रादुर्भाव पशुधनामध्ये आढळून आला आहे. हा रोग झनोटिक म्हणजे जनावरांपासून माणसांना होणारा रोग या स्वरूपाचा आहे. या रोगाचा प्रादुर्भाव गुजरात मधून महाराष्ट्रात होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी याबाबत विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस. एस. बेडक्याळे यांनी केले आहे.
हा रोग नैरो या विषाणूमुळे होत असून हे विषाणू मुख्यत्वेकरून गोचीडाव्दारे एका जनावरापासून दुसऱ्या जनावराला व बाधित जनावरापासून मानवांमध्ये संक्रमित होतात. या रोगामुळे पाळीव प्राण्यांमध्ये उदा. गायी, म्हैशी, शेळ्या, मेंढ्या इत्यादी तसेच शहामृग इत्यादी पक्ष्यांमध्ये सहसा रोगाची कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. पण अशी बाधित जनावरे / पक्षी या विषाणूंचे वाहक म्हणून कार्यरत राहतात. अशा वाहक जनावरांच्या संपर्कामध्ये आलेल्या मानवांना या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. याचप्रमाणे अशा बाधित जनावरांचे मांस खाल्याने तसेच बाधित जनावरांच्या रक्ताच्या संपर्कात आल्याने मानवांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याचे डॉ. बेडक्याळे यांनी सांगितले.
या रोगाच्या प्रादुर्भावामुळे बाधित व्यक्तिंपैकी 30 टक्क्यापर्यंत व्यक्ती त्वरीत निदान व उपचार न झाल्यास मृत्यू पावण्याची शक्यता असते. या विषाणूजन्य रोगाविरूध्द प्रभावी व हमखास उपयुक्त उपचार सध्या उपलब्ध नाहीत. या रोगाने बाधित झालेल्या व्यक्तींमध्ये सुरूवातीला डोकेदुखी, ताप येणे, सांधेदुखी, पोटदुखी, उलटी होणे आदि लक्षणे दिसून येतात. आजारी व्यक्तीचे डोळे लाल दिसतात. घशात तसेच तोंडातील वरच्या भागात लाल ठिपके दिसू लागतात. आजार बळावल्यास त्वचेखालील रक्तस्त्राव, नाकातून रक्तस्त्राव अशी विचित्र लक्षणे दिसून येतात. या रोगाची लागण ज्या व्यक्तीचा व्यावसायिक कारणामुळे संक्रमित पशुशी संपर्क येतो अशा कत्तलखान्यात कामकाज करणाऱ्या व्यक्ती अथवा पशुपालकांना होण्याची शक्यता असल्याचे डॉ. बेडक्याळे यांनी सांगितले.
या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून पुढीलप्रमाणे प्रयत्न करणे आवश्यक आहे – पशुपालकांनी जनावरांवरील व गोठ्यामधील गोचिड व कीटकांचे उच्चाटन करणे आवश्यक आहे. यासाठी बाह्य कीटकांचा व गोचीडांना नाश करणाऱ्या औषधांची फवारणी स्थानिक पशुवैद्यकांच्या सल्ल्याने जनावरांवर व गोठ्यामध्ये करणे अत्यावश्यक आहे. रोगग्रस्त पशुंचे कच्चे मांस खाल्याने प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे मांस चांगल्या प्रकारे शिजवूनच खावे. कत्तलखान्यात काम करणाऱ्या व्यक्तींनी प्राण्यांच्या रक्त/मांस इथवा इतर द्रावाशी थेट संपर्क येणार नाही, यासाठी योग्य ती काळजी घ्यावी. त्यामध्ये पायात गमबूटस घालणे, हातामध्ये ग्लोव्हज घालणे व चेहऱ्यावर मास्क बांधने किंवा पूर्ण शरीरभर संरक्षक कपड्यांचा वापर करणे अत्यावश्यक आहे. या प्रमाणे जनावरांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती उदा. शेतकरी, पशुपालक यांनी देखील काळजी घेणे आवश्यक आहे. अशा व्यक्तींमध्ये आजारपणाची लक्षणे दिसून आल्यास त्याची माहिती ताबडतोब नजीकच्या आरोग्य विभागास द्यावी, असे आवाहनही डॉ. बेडक्याळे यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close