भिलवडीत भरदिवसा 10 लाखांची चोरी
कोरोना बाधीत रुग्णांचा घेतला फायदा
भिलवडी : भिलवडी ता.पलूस येथील श्री राम ज्वेलर्सचे मालक श्रीराम सुरेश पोतदार वय वर्षे ३६ तसेच त्यांचे वडील सुरेश बाळकृष्ण पोतदार यांच्या सह कुटुंबीयांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.त्यामुळे सदर कुटुंबातील कोरोना बाधीत रुग्णांवरती सांगलीमध्ये उपचार सुरू होते.त्यामुळे त्यांच्या घरी सध्या कोणीच नव्हते.घराला कुलुप लावले होते.याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून, घरातील तिजोरीतील सुमारे पाचशे ते सहाशे ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवरती डल्ला मारला असून, चांदीच्या कोणत्याही दागिन्यांना चोरट्यांनी हात लावला नाही. सदर दागिन्यांची किंमत सुमारे ९ लाख ९१ हजार ५०० रुपये तसेच रोख रक्कम १५ हजार असा सुमारे १० लाखांचा मुद्देमाल लंपास केला असल्याचा अंदाज आहे. दरम्यान भिलवडी पोलीसांना याची खबर लागताच विटा उपविभागीय पोलिस अधिकारी अंकुश इंगळे, भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग, पोलीस उपनिरीक्षक विशाल जगताप यांच्या सह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.त्याच बरोबर घटना स्थळाचा पंचनामा करून फिंगरप्रिंट व डॉग स्काॅडला पाचारण करण्यात आले परंतु मंगळवार दि. १५ सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत कोणतेच धागेदोरे हाती लागू शकले नाहीत.सदर घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास कोडग हे करीत आहेत.भारतीय स्टेट बँकेच्या समोर दाटवस्तीमध्ये असलेल्या या इमारतीमध्ये रात्रीच्या सुमारास धाडसी चोरी झाल्याने भिलवडी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे