नवी वाट..!

एक छोटंसं खेडेगाव, हिरवाईने नटलेलं. द्राक्षबागा आणि ऊसाची पीक चहुवार डोलत होती.गावात गणेशाचं मंदिर. रोज सकाळी पहाटे पाचलाच गणेशाची आरती व्हायची. त्या घंटानादाने गाव जागा व्हायचा. मिनाचे कुटूंब गावापासून किलोमीटरच्या तीन किलोमीटरच्या अंतरावर राहायचे. एकत्र कुंटुब होते. घरात पंचवीस तीस माणसं गुण्यागोविंदाने राहायची.शेती भरपूर होती.सर्वजण दिवसभर शेतात कष्ट करायची. शेतातून चांगले उत्पन्न निघायचे. त्यामुळे घरात कशालाच कमी नव्हती.
मीना आणि इतर सर्व भावंडं सायकलवरून शाळेत जायची.गावाच्या जवळच तालुक्याचे ठिकाण होते. तिथं कॉलेज शिक्षणासाठी जावं लागायचं.सर्व मुली मन लावून अभ्यास करायच्या पण मुले मात्र सारखी शेतीच्या कामातच लक्ष द्यायची. आजोबा नातवानां म्हणायचे “अरें बाळांनो शिकायचं वय हाय तोवर शिकून घ्या,शेतातल्या कामाकडं तुम्ही नका ध्यान देऊ.एकदा का शिक्षणात मागं पडलासा तर परत कायबी बोलून उपयोग होणार नाय. मग आमच्यावाणी शेतात रात्रंनदिस राबावं लागलं.”
मुली चांगल्या शिकल्या .पदवीचे शिक्षण पूर्ण झाले की स्थळं पाहणं सुरू झालं.मीनाला व्यापारी वर्गातील घरंदाज स्थळ चालून आले. तिची इच्छा नोकरी करणारा मुलगा हवा व स्वतःही स्वावलंबी बनावं आशी होती .पण तिचे विचारा घरातील मोठ्या माणसाच्या विचारापुढे मागे पडले.
खूप थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. आख्या गावाला श्रीखंड पुरीचे जेवण दिले. मीनाला लग्नात गळाभरून सोनं घातलं. ती पण मनोमनी आनंदली. पती शरद सुद्धा दिसायला भारदस्त आणि गुणी होता.
सुखाचा संसार चालू होता. तिचे दीर सोन्याचांदीचा व्यापार करायचे .त्यांचे कुटूंब परगावी राहण्यास होते. चार सहा महिन्यातून ते गावी यायचे.तर तिचे पती कापड दुकान चालवायाचे.घरची शेती सासू सासरे पहायचे.घरातील सर्व कारभार एकोप्याने चालायचा.बघता बघता ती दोन मुलांची आई झाली. मुलगी मोठी व मुलगा छोटा होता. मुलांना खूप शिकवायचे त्यांना काहीही कमी पडू द्यायचे नाही हे शरदचे स्वप्न होते. त्याने मुले अभ्यासाबरोबर इतर ऍक्टिव्हिटीमध्ये सुध्दा ती तयार व्हावी म्हणून त्यांना क्रीडा, वादन, पेंटींग क्लासला घातली. मुलेही या सर्व गोष्टी मनापासून करत होती. तिची मुलगी मेघा प्रत्येक स्पर्धेत विजयी ठरत होती. तिच्याबरोबर, आईवडीलांचेही कौतुक सर्वत्र होत होते.
सर्व आनंदात आसताना नियतीच्या मनात मात्र वेगळंच होतं. दिवाळीचे दिवस होते. घरोघर फराळाचे पदार्थ बनवण्याची लगबग सुरू होती.तळलेल्या तेलाचा, भाजणीचा वास सगळीकडे दरवळत होता. आकाशकंदील दारोदार सजले होते. बाजारपेठा फुलल्या होत्या. वस्तूची खरेदी करण्यासाठी माणसांची झुबंड उडाली होती. आज शरद दुपारीच दुकानातून घरी आला. पटपट जेवण उरकले. मीना त्याला जेवण वाढत म्हणत होती “अहो शांत जेवण करा ,एवढी गडबड कसली?”त्यावर शरद म्हणाला “मी दिवाळीसाठी मागवलेलं कपड्याचे पार्सल आले आहे.त्या कपडयाना गिऱ्हाईकांची मागणी आहे .हा गेलो आणि लगेच आलो.”त्याने कसेबसे जेवण उरकले आणि गाडी घेऊन तो निघून गेला. मीना परत घरकामात व्यस्त झाली.
तिन्ही सांजेची वेळ झाली. सासू सासरे शेतातून घरी येताच तिने त्यांना चहा करून दिला. दारात पणती लावली, आकाशकंदील लावला. शरद अजून आला नव्हता.तिने त्याला फोन केला पण फोन लागत नव्हता. प्रवासात असतील म्हणून ती परत स्वयंपाक घरात शिरली. तितक्यात फोनची रिंगटोन वाजली. तो शरदाचा फोन होता. तिने लगेच फोन घेतला. पण पलीकडून शरद बोलत नव्हता. एका अनोळखी व्यक्तीने शरदाचा अपघात झाल्याचे सांगितले. तिचे पाय थरथर कापू लागले. अंगाला घाम सुटू लागला. ती काही बोलण्याचा आताच त्या व्यक्तीने शरदला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे सांगितले. सासऱ्यानी लगेच माणसे जमवली आणि ते हॉस्पिटलकडे निघून गेले. मिनाही त्यांच्यासोबत येण्याचा हट्ट करत होती. पण”आम्ही आहोत त्याची काळजी घ्यायला तू मुलांकडे लक्ष दे “आसे बोलून त्यांनी तिला गप्प बसवले होते. ती रात्रभर झोपलीच नाही.एक अनामिक भीती तिच्या मनात दाटून आली होती . दोन्ही मुलांच्या अंगावर हात फिरवत त्यांना समजावत तिने रात्र काढली.सकाळी सासऱ्यानी शरद ठीक असल्याचे सांगितले. तिला थोडेसे हायसे वाटले .सायंकाळच्या वेळेला तिच्या घरासमोर माणसांची गर्दी वाढू लागली.तशी तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिचे वडील ,भाऊ ,आईसर्वजण येताच तिने हंबरडा फोडला. भिंतीवर डोके आपटून घेऊ लागली.” माझा नवरा कुठाय?तुम्ही सगळे आलात त्यांना कुठे ठेऊन आलात?एवढेच ती विचारात राहिली. तोपर्यंत हॉस्पिटलची शववाहिका दारात उभी राहिली. त्यातुन पांढऱ्या कपड्यात लपटलेला शरदचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
तसा सर्व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. सर्वांना जीव लावणारा, दुसऱ्याच्या कल्याणा साठी झटणारा मात्र आपले भरलेले घरटे सोडून गेला होता. त्याची पाखरं आजून लहान होती. मुलगा चौथीत तर मुलगी सहावीत होती.
दोन्ही मुलांना फारसं काही कळण्याच्या आताच त्यांचा बाप त्यांना सोडून गेला होता.
या घटनेचा मीनाच्या मनावर खूप आघात झाला. ती रात्रंदिवस पतीच्या आठवणीत आणि मुलांच्या भविष्याचा काळजीने चिंताग्रस्त झाली. तिला काहीच सुचत नव्हते.कशाचेच भान तिला राहत नव्हते. आलेले पाहुणेरावळे आपआपल्या घरी निघून गेले.तिच्या जावेला वाटू लागले की आता सर्व कुटूंबाची जबाबदारी आपल्याच नवऱ्याला पहावी लागते की काय?नेहमी प्रेमाने वागणाऱ्या जावेच्या स्वभावात बदल झाला होता.ती सगळ्यांनाच टाकून बोलू लागली. तरुण मुलाच्या अचानक जाण्यामुळे सासू सासऱ्यानी तर अंथरूणच धरले होते.तेराव्याचा विधी उरकला की मोठा दीर आपले कुटूंब घेऊन निघून गेला.
सुख के सब साथी!
दुःख का ना कोई!
आशी अवस्था तिची झाली होती. सदोदीत आनंद असणाऱ्या घरात आता स्मशान शांतता होती. एका खोलीत सासू सासरे दुसऱ्या खोलीत मीना आणि तिची मुले बसलेली असायची.ती आपल्या पतीच्या फोटोकडे पाहत आसवे गाळायची बसायची. दोन्ही मुले तिला बिलगून रडायची. आईला धीर द्यायची. आपल्या चिमुकल्या हातानी तिची आसवे पुसायची.
आसेच दिवस चालले होते. एक दिवस तिची खूप जुनी मैत्रीण अनिता तिला भेटायला आली.मैत्रिणीला पाहताच तिचा दुःखाचा बांध फुटला. आपल्या अनेक जुन्या आठवणी तिने तिच्यासमोर ओकल्या. अनिताने तिला धीर दिला.ती तिला म्हणाली”आयुष्यात घडणाऱ्या काही घटना आपण टाळू शकत नाही. हातपाय गाळून स्वतःला कोंडून घेऊन कोणताही प्रश्न सुटणार नाही तर आणखीनच अडचणी वाढतील. कोणी कुणाच्या आयुष्याचं ओझं उचलत नाही. तुलाच खंबीर होऊन जबाबदरी घ्यावी लागेल. तरच काहीतरी चांगला मार्ग निघेल आणि तुझ्या दोन्ही मुलांचे जीवन सुखकर होईल. उठ आता कामाला लाग.सासुसासऱ्याना तू आता आधार दे.”
अनिताने तिला छोटे उद्योग, कर्ज योजना, याची सर्व माहिती दिली. पतीचे आधीचे दुकान विकून टाकले.वडिलांच्या मदतीने तिने लोणची पापड बनवण्याचाव्यवसाय सुरू केला. घराबाहेर न पडणारी ती आता स्वतचं सर्व कारभार हाताळू लागली. या कामात सासू सासरे आणि तिचे वडील तिच्या सोबत मदतीला राहिले.
बघता बघता व्यवसाय वाढत गेला.अनेक स्त्रियांच्या हाताला काम मिळाले. त्यातील अनेकींचे दुःख तिच्यासारखेच होते. ती आता त्यांना आधार देऊ लागली. आयुष्यात येणाऱ्या संकटाला कसे तोंड द्यावे ते ती त्यांनासांगू लागली.
आता तिची मोठी मुलगी डॉक्टर झाली. आणि मुलगा एमबीए करून आईच्या उद्योगात तिला मदत करू लागला. आता तिचे दिवस पालटले होते. खूप सुख समृद्धी तिच्या घरात नांदत होती. ज्यांनी तिच्या संकटाच्या वेळी पाठ फिरवली तेच मदत मागण्यासाठी तिच्याकडे येऊ लागले होते.पण तिने आपल्या वागण्याबोलण्यात संयम ठेवला. योग्य वेळी योग्य व्यक्तीना तिने आपल्या परीने मदत केली. तिच्यासारख्या अनेक स्त्रियांना तिने उभे केले.
आज तिच्या मुलीचे मेघाचे लग्न होते. शाही विवाहसोहळा पार पडणार होता. सकाळपासून तिच्या मनाला वेगळीच हुरहुर लागली होती.ती उठली आणि शरदच्या फोटोकडे पाहत म्हणाली
“हा आनंद सोहळा पाहायला तुम्ही माझ्यासोबत हवे होता ,हवे होता.”
लेखिका-रंजना सानप
मायणी