कोटपा कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करा : अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम

तंबाखू सोडण्यासाठी क्विट लाईनवर कॉल करून मदत घ्या
सांगली, दि. 19 : सार्वजनिक रूग्णालय, कुठल्याही शैक्षणिक संस्थांच्या 100 यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास कायद्याने बंदी आहे. सन 2020-21 मध्ये शालेय कार्यक्रमांतर्गत शाळेच्या 100 यार्ड परिसरात यलो लाईन कॅम्पियन राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमासह राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत घेण्यात येणारे सर्व उपक्रम काटेकोरपणे राबवावेत, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय तंबाखू संनियंत्रण समितीची बैठक अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुजाता जोशी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शहानवाज नाईकवाडे, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त एस. ए. चौगुले, अन्न सुरक्षा अधिकारी आर. एस. महाजन, प्राचार्य भास्कर ताम्हनकर, किशोर डोंबे, उदयराजे भोसले, माणिक भोसले, रविंद्र कांबळे, ज्योती राजमाने आदि समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते.
अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम म्हणाले, तंबाखू सेवन करणाऱ्या सुमारे 33 टक्के लोकांना ती सोडण्याची इच्छा असते, असे एका सर्वेक्षणामध्ये आढळून आले आहे. त्यामुळे अशा लोकांना तंबाखू सोडण्यासाठी मदतीची गरज ओळखून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला. सांगली जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाची सुरूवात 2017 मध्ये करण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत 1800112345 /1800112356 या क्विट लाईनवर कॉल करून अथवा 011-22901701 या क्रमांकावर मिस्ड कॉल देवून तसेच http://www.nhp.gov.in/quit-tobacco या बेबसाईटवर लॉगीन करून तंबाखू सोडण्यासाठी अधिकाधिक लोकांनी मदत घ्यावी, असे आवाहनही अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम यांनी यावेळी केले. यावेळी त्यांनी सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम 2003 (कोटपा) कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी. अन्न व औषध प्रशासनाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक व विक्री याबाबत आवश्यक ती कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
सांगली जिल्ह्यात सन 2020-21 मध्ये 140 शाळा तंबाखू मुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे त्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.
टी.बी. रूग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग 100 टक्के करा…. अप्पर जिल्हाधिकारी
जिल्हा टी. बी. फोरमची बैठक अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी त्यांनी टी.बी. रूग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग 100 टक्के करा. तो स्प्रेड होणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुजाता जोशी यांनी जिल्ह्यातील टी. बी. रूग्णांबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच टी. बी. विषयी माहिती देण्यासाठी 1800116666 ही हेल्प लाईन कार्यरत असल्याचे सांगून याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.