महाराष्ट्रसांगली

अद्ययावत उपजिल्हा रुग्णालयामुळे इस्लामपुरच्या वैभवात भर:आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे

सांगली, दि. 17 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाटा ट्रस्टच्या वतीने 10 कोटी रुपये खर्च करुन इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालय अतिशय अद्यावत यंत्र सामुग्रीसह, फ्लोरिंग, टेलिमेडिसिन, सीसीटीव्ही, व्हेंटीलेटरसह नुतनीकरणी करण्यात आले आहे. या रुग्णालयाचा चेहरामहोरा बदलण्याचे काम टाटा ट्रस्टच्या मदतीने करण्यात आले आहे. त्यामुळे अतिशय गंभीर रुग्णांवरही उपचार करण्याची सोय येथे झाली आहे. इस्लामपूरवासीयांसाठी उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध झाली आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या नुतनिकरण व अद्ययावतीकरणामुळे इस्लामपुरच्या वैभवात भर पडली आहे. असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री राजेश टोपे यांनी केले.
टाटा ट्रस्टच्या सहाय्याने इस्लामपूर येथील जिल्हा उपरुग्णालयाच्या इमारतीचे नुतनीकरण केले. या इमारतीचे लोकार्पण राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याहस्ते तर राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात झाले यावेळी ते बोलत होते यावेळी, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार धैर्यशिल माने, आमदार सदाभाऊ खोत, आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस प्रमुख सुहैल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा शल्य चिकित्सक संजय साळुंखे, उपविभागीय अधिकारी नागेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, कोव्हिड 19 च्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये विविध ठिकाणी रुग्णालये व्हावीत यासाठी टाटा समुहाकडे मागणी करण्यात आली होती. त्यानूसार रतन टाटा यांनी त्यास मान्यता देऊन इस्लामपूर येथे जिल्हा उपरुग्णालयाच्या इमारतीचे नुतनीकरण केले. टाटा हे मुल्यांसाठी ओळखले जातात, संपुर्ण देशाला त्यांच्याबद्दल आदर आहे. टाटा ट्रस्टने अत्यंत गरजेच्यावेळी समाजाला व शासनाला मदत दिली आहे. इस्लामपूर व बुलढाणा या ठिकाणी दिलेल्या आरोग्य सुविधेबद्दल टाटा व टाटा ट्रस्ट यांचे महाराष्ट्र शासन व आरोग्य विभाग यांच्यावतीने आभार माणुन याप्रमाणोच जालना येथे अशा प्रकारची आरोग्य सुविधा द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी टाटा ट्रस्टला केले.
आरोग्य सेवेकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही हे जागतीक पातळीवर सिध्द झाले आहे. त्यामुळे आरोग्य सेवा व सुविधा यांच्यावरचा खर्च वाढविणे आवश्यक आहे असे सांगून राजेश टोपे म्हणाले, आरोगय विभागातील 17 हजार जागा लवकरच मेरीटवर भरण्यात येतील त्यातून आरोग्य यंत्रणा सक्षम होईल. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात अत्यंत कमी खर्चात आरोग्य सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयांचे अधिग्रहण करुन त्यांच्या बिलांचे ऑडिट लेखा पथकांद्वोर करण्यात येत आहे. शासन सर्वांच्याच आरोग्याचे व हिताचे रक्षण करण्यास कटीबध्द आहे.
आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, आयएमईच्या बैठकीमध्ये बऱ्याचदा खासगी डॉक्टारांना विमा कवच देण्याबाबत मागणी केली होती. त्यानूसार जर खासगी डॉक्टर कोव्हिड रुग्णांवर उपचार करत असताना जर बाधीत झाले आणि त्यांचा दुर्दैवाने मृत्यु झाला तर त्यांनाही 50 लाखांचे विमा कवच लागू करण्यात आले आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी कोव्हिड सेवेमध्ये आग्रेसर राहावे. तसेच त्यांच्या हल्ले झाले तर त्यासाठी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही गृह विभागाला देण्यात आले आहेत.
आपण कोरोना सोबत जगायच असे म्हणतो त्यासाठी मास्क आणि सॅनिटाईजर या दोन्ही गोष्टी वापर अत्यंत आवश्यक आहे.म्हणून या दोन्ही गोष्टी अत्यावश्यक सेवेमध्ये घेण्यात येणार असून या त्यांच्या दरावरही शासनाचे नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी त्याच्या बारकाईने अभ्यास सरु असून त्यासंबधीचा निर्णयही लवकरच घेण्यात येणार आहे. असेही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, टाटा ग्रुपने हे उपरुग्णालय अद्यावत करण्यासाठी तयारी दर्शवली आणि हे रुग्णालय आज उभे राहिले आहेत. टाटा समूह, रतन टाटा यांचा आभारी आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे या संकटकाळात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. टाटा समुहाने सामाजिक उत्तरदायित्व नेहमीच अत्यंत संवेदनशिलपणे निभावले आहे. असा गौरवपुर्ण उल्लेखही त्यांनी यावेळी केला.
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोना आपल्या देशामध्ये ज्या काळात आला त्याची सुरुवातच इस्लामपूरपासून झाली अस वाटव इतक्या झपाट्याने इस्लामपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. मात्र इस्लामपूरच्या जनतेने त्यांच्यावर लवकरच नियंत्रण करुन दाखवलं. जून आणि जुलै महिन्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली. त्यासाठी आपण लॉकडाऊन केले आणि अनेक लोकांनी आपल्या गावाचा रस्ता धरला, लोकांमध्ये एक अस्वस्थता पसरली. शहरातून गावाकडे येणाऱ्या लोकांची संख्या वाढली त्यामुळे गावातही कोरोना फोफावला आहे. मात्र ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन दक्षता घेत आहे. गेले चार महिने प्रशासन जबाबदारीने काम करत आहे. जिल्हाधिकाऱ्यांपासून सामान्य कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच जण कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. नागरिकांनी प्रशासनाला जे सहकार्य केले त्यासाठी मनापासून आभार व्यक्त केले.
कृषीराज्यमंत्री विश्वजीत कदम म्हणाले, दर्जेदार आणि अद्यावत सुविधा इस्लामपूरमध्ये लोकनेते राजारामबापु पाटील यांच्या जयंती शताब्दी वर्षात निर्माण होणे हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली आहे. प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. यामध्ये त्यांनी इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोव्हिड रुग्णांवर उपचारासाठी अत्यंत जलद कलावधीमध्ये अंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा निर्माण झाली आहे. 50 बेडची डेडिकेटेड कोव्हिड रुग्णालयाची सुविधा उभी राहिली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा सुविधांची गरज व महत्व फार मोठे आहे. आजपासूनच हे रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय म्हणुन पुर्ण क्षमतेने सुरु राहिल असे सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close