अधिग्रहित रूग्णालयांनी लेखा परीक्षणानंतरच कोविड रूग्णांकडून देयकाची रक्कम घ्यावी : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
सांगली, दि. 12 : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व वाढती संख्या पाहता ज्या खाजगी हॉस्पीटलमध्ये बेडची सुविधा आहे, असे खाजगी हॉस्पिटल कोविड-19 विषाणू बाधित रूग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध करून घेण्यात येत आहेत. रूग्णांवर उपचारासाठी सेवा अधिग्रहित केलेल्या रूग्णालयांनी शासनमान्य दराने देयकांची आकारणी केल्याबाबतची खात्री करण्यासाठी लेखा अधिकाऱ्यांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार अंगीकृत हॉस्पिटलनी रूग्णांवर उपचार केल्याबाबतचे पक्के बील तीन प्रतीत तयार करून त्याची एक प्रत लेखा तपासणी अधिकारी यांना डिस्चार्जपूर्वी तपासणीसाठी सादर करणे आवश्यक आहे. सदर बिलाची लेखा तपासणी अधिकाऱ्यांनी छाननी केल्यानंतर त्यांनी अंतिम केलेल्या देयकाची रक्कम रूग्णाकडून घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.
यामध्ये कुचराई केल्यास भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1887, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्टताही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.