कोरोना : जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सीजन उपलब्ध : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
रूग्ण सेवा नाकारल्यास खाजगी रूग्णालयांची नोंदणी रद्द करणार
सांगली, दि. 05 : कोविड-19 उपचारासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या कोणत्याही रूग्णालयांसाठी ऑक्सीजनचा तुटवडा नसून पुरेशा प्रमाणात ऑक्सीजन साठा उपलब्ध आहे. एखाद्या रूग्णालयातील ऑक्सीजन संपल्यास पुरवठादाराकडून अत्यंत अल्प काळात तो उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. त्यामुळे कोणीही घाबरून जावू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. यावेळी त्यांनी अंगीकृत खाजगी रूग्णालयांनाही प्रशासन आवश्यक पाठबळ देत आहे. खाजगी रूग्णालयानीही रूग्णांच्या प्रती असणाऱ्या आपल्या उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून स्वत:हून रूग्ण सेवेसाठी पुढे यावे, असे आवाहन करून कोरोना महामारीशी संपूर्ण जग झुंज देत असताना जी रूग्णालये रूग्ण सेवा नाकारतील अथवा त्यामध्ये टाळाटाळ करतील त्यांची नोंदणी रद्द करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात वृत्तपत्रांचे संपादक, आवृत्ती प्रमुख यांच्याशी संवाद साधताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी बोलत होते.यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस उपस्थित होते. अंगीकृत केलेल्या कोविड रूग्णांलयामध्ये बील आकारणीबाबत पारदर्शकता असावी. बीलांबाबत कोणत्याही प्रकारच्या तक्रारी उपस्थित होऊ नयेत यासाठी बील तपासणीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक प्रत्येक हॉस्पीटलला नियुक्त करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी सांगितले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सद्या उपलब्ध असणाऱ्या बेड्स च्या क्षमतेमध्ये वाढ करण्यात येणार असून यासाठी इस्लामपूर, विटा सारख्या शहरांमध्ये खाजगी रूग्णालये कोविड उपचारासाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.
यावेळी जे कोविड बाधीत रूग्ण रूग्णांलयांमध्ये ॲडमीट आहेत त्यांची माहिती नातेवाईकांना मिळावी यासाठी हेल्प डेस्क् तयार करण्यात येणार असल्याचे सांगून प्रिस्क्रीप्शन वरील औषधे दुकानदारांकडून उपलब्ध होतीलच पण किरकोळ आजारांवरील औषध विक्रीला ही कोणतेही बंधन नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.
महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी महानगरपालिका क्षेत्रात १० ठिकाणी रॅपीड ॲन्टीजेन टेस्ट सुरू करण्यात येणार असून त्यामुळे बाधितांवर लवकर उपचार सुरू होतील असे सांगून यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
या चर्चेदरम्यान हॉस्पीटल बेड इन्फॉर्मेशन सिस्टीमबद्दल उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली.