कंटेनमेंट झोन अधिसूचनेसाठी आता महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त तर इतर ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांना अधिकार
सांगली : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून जिल्ह्यात विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहेत. तसेच राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यात कोरोना विषाणूचे रूग्ण आढळलेल्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून कंटेनमेंट झोन केले जातात. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कंटेनमेंट झोनची अधिसूचना संबधित ठिकाणी रूग्ण आढळून आल्यानंतर तात्काळ होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्र वगळून, जिल्हातील कोरोना रूग्ण आढळलेल्या ठिकाणी कंटेनमेंट झोनची अधिसूचना प्रसिध्द करणे व शासन निर्देशानुसार विहीत कालावधी नंतर अधिसूचना रद्द करण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी अधिकार प्रदान केले आहेत.
जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, कलम 34 मधील पोटकलम (C)व (m), महाराष्ट्र शासन क्र. करोना 2020 प्र.क्र. 58/आरोग्य6 दि. 14 मार्च 2020 अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर आदेश निर्गमित केले आहेत. महाराष्ट्र शासन महसूल व वन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, मंत्रालय यांच्याकडील आदेश क्र. डीएमयु/2020/सीआर-92/डीआयएसएम-1 दि. 31 मे 2020 आदेशानुसार महानगरपालिका क्षेत्रात सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त यांनी कोरोना रूग्ण आढळलेल्या ठिकाणी कंटेनमेंट झोनची अधिसूचना घोषित करणे व शासन निर्देशानुसार विहीत कालावधी नंतर अधिसूचना रद्द करण्याची कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त व संबंधित उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनी घोषित केलेल्या तसेच रद्द केलेल्या कंटेनमेंट झोनच्या अधिसूचनेबाबतचा दैनंदिन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.