भूखंड मागणीसाठी अर्ज न केलेल्या वांग मराठवाडी प्रकल्पग्रस्तांनी जुलै पर्यंत अर्ज करावेत : अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम
अर्ज केलेल्या प्रकल्पग्रस्तांनी अर्जातील त्रुटी पूर्तता 15 जुलै पर्यंत करावी
सांगली : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील वांग मराठवाडी प्रकल्पातील एकूण 7 गावांचे (रेठरेकरवाडी, केकतवाडी, मेंढ, घोटील, उमरकांचन, निगडे, जिंती) पुनर्वसन सांगली जिल्ह्यातील कडेगाव व विटा या तालुक्यातील वसाहतींमध्ये करण्यात आलेले आहे. ज्या वांग मराठवाडी प्रकल्पग्रस्तांनी अद्याप जमीन / भूखंड मागणी अर्ज सादर केलेले नाहीत त्यांनी आपले अर्ज दि. 15 जुलै 2020 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्वसन शाखेत जमा करावेत. तसेच यापूर्वी जमीन / भूखंड मागणी अर्ज केलेल्या प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या अर्जातील त्रुटी पूर्तता दि. 15 जुलै 2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यात एकूण पुनर्वसित प्रकल्पग्रस्तांपैकी पात्र प्रकल्पग्रस्तांना जमीन / भूखंड वाटप करण्यात आले आहे. तथापि काही प्रकल्पग्रस्तांना अंशत: / पूर्णत: जमीन व भूखंड वाटप करण्याचे शिल्लक दिसून येत आहे. यापूर्वी संबंधितांना नोटिशीव्दारे सूचित करूनही आद्याप त्यांचे अर्ज प्राप्त झालेले नाहीत. दिनांक 15 जुलै पर्यंत अर्ज प्राप्त होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार जमीन / भूखंड वाटप करण्यात येईल. जे प्रकल्पग्रस्त वरील कालावधीत जमीन / भूखंड मागणी अर्ज सादर करणार नाहीत, त्यांना प्रशासनाकडून एकतर्फी जमीन / भूखंड वाटपाची कार्यवाही करण्यात येईल. एकतर्फी जमीन / भूखंड वाटप झाल्यानंतर पुन्हा जमीन व भूखंड मागणी अर्जाची जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दखल घेण्यात येणार नाही, याची सर्व प्रकल्पग्रस्तांनी नोंद घ्यावी, असे अपर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम यांनी स्पष्ट केले आहे.