महाराष्ट्रसांगली

कोरोना पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील यंत्रणांमधील समन्वय उल्लेखनीय : पालकमंत्री जयंत पाटील

सांगली : कोरोना प्रादुर्भावाच्या सुरवातीच्या काळात परदेशवारी करून आलेल्या काही इस्लामपूर येथील प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याने जिल्ह्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. परंतु कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अचूक व गतीने करण्यात आल्याने कम्युनिटी प्रादुर्भावाचा धोका टळला. यामध्ये महसूल, पोलीस, आरोग्य या सर्वच यंत्रणांचा सहभाग अत्यंत उल्लेखनीय होता. यंत्रणांमधील उत्तम समन्वयामुळेच जिल्ह्यातील कोरोनाच्या प्रार्दुभावावर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
कोरोना संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत तसेच कायदा व सुव्यवस्थेबाबत जलसंपदा मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदर संजय पाटील, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, राज्य गुप्तवार्ता विभागाचे अप्पर उपायुक्त संजीवकुमार पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात कोरोना बाधितांवर त्वरीत आणि अतिशय चांगले उपचार केले जात आहेत. लॉकडाऊननंतर स्थलांतराला परवानगी मिळाल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव असणाऱ्या मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे या कोरोना हॉटस्पॉट भागातून नोकरीधंद्यासाठी बाहेर गावी असणारे अनेक लोक आपल्या मुळ गावी परत आले. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या वाढली. असे असले तरी संपूर्ण प्रशासन व आरोग्य विभाग यांनी अत्यंत सुक्ष्म नियोजन करून स्थिती नियंत्रणात ठेवली असल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. कोविड-19 ची जशी काळजी आहे, तशी लोकांच्या मनात पूराचीही धास्ती आहे, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, संभाव्य पूरकाळातील आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी झाली आहे. तसेच आवश्यकता भासल्यास लोकांना स्थलांतरीत करण्यासाठी जागा निश्चित करून आवश्यक आराखडे तयार करण्यात आले आहेत. जलसिंचन विभागाच्या वतीने पाण्याचा विसर्ग नियोजनबध्द करण्यात येणार आहे, असे सांगून आपत्तीच्या काळात जिल्हा पोलीस दल अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करत आहे. तसेच प्रशासकीय टीमचा परफॉर्मन्स ही अत्यंत चांगला आहे, अशा शब्दात त्यांनी यंत्रणांचे कौतुक केले.
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेचे
योगदान महत्वपूर्ण – गृहमंत्री अनिल देशमुख

पोलीस विभाग, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यांच्यात अत्यंत चांगला समन्वय असून राज्यभर कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यात पोलीस यंत्रणेचे योगदान महत्वपूर्ण आहे. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता पोलीस दल अहोरात्र कष्ट घेत आहे, असे सांगून गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने हळूहळू उद्योगधंदे गती घेत आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात स्वराज्यात व स्वगावी परत गेलेले मजूर, श्रमीक पुन्हा कामासाठी महाराष्ट्रात येत आहेत. त्यामुळे स्थानीक यंत्रणांवर पुन्हा ताण वाढणार आहे. त्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे. इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन काटेकोर पध्दतीने व्हावे, असे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला.
सद्यस्थितीत जिल्ह्यात ८१ कंटेनमेंट झोन सुरू असून ग्रामीण भागात ६८, शहरी भागात ८, मनपा भागात ५ कंटेनमेंट झोन सुरू आहेत. आजअखेर जिल्ह्यात ३३९ कोरोना पॉझीटीव्ह रूग्ण झाले असून यापैकी २२१ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. १०६ रूग्ण रूग्णालयात उपचाराखाली आहेत तर १२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर ९ हजार १८५ थ्रोट स्वॅब तपासण्यात आले आहेत. सद्यस्थितीत १३ ठिकाणी संस्थात्मक अलगीकरण करण्यात येत असून यामध्ये ४४१ व्यक्ती आहेत तर २२४ व्यक्ती गृह अलगीकरणामध्ये आहेत. ३८ ठिकाणी कोविड केअर सेंटर, ४९ ठिकाणी डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर व ४ जिल्हास्तरीय कोविड हॉस्पीटल यांचा समावेश आहे. रूग्ण दुप्पटीचा दर २७.८ तर जिल्ह्यात मृत्यू दर ३.१ आहे. अशी माहिती यंत्रणांनी यावेळी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी जिल्ह्यात कोविड अनुषंगाने तपासणी सुविधा चांगली असून पीपीई किट अन्य संरक्षक सामग्री पुरेशा प्रमाणात आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मनुष्यबळ वृध्दी करण्यात आले असून यामाध्यमातून आयुष मेडिकल अधिकारी व स्टाफ नर्स उपलब्ध झाल्या आहेत. तसेच कम्युनिटी हेल्थ अधिकाऱ्यांचाही चांगला उपयोग होत आहे. प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर कार्यरत झाले असून ज्या ठिकाणी आयसीयु सुविधा निर्माण केल्या आहेत त्या ठिकाणी ऑक्सीजीनेशन सुविधाही जोडण्यात आल्या आहेत. रूग्ण संख्या वाढल्यास बेडची संख्या वाढविण्यासाठी आवश्यक ती तजवीज केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा सादर करताना पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा म्हणाले, सांगली जिल्ह्यात आंतरराज्य सीमा चेकपोस्ट एकूण ११ असून आंतरजिल्हा सीमा चेकपोस्ट २१ आहेत. या सर्व ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. लॉकडाऊनचे यशस्वी पालन व्हावे यासाठी २५ मार्च पासून जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तुंची घरपोच सुविधा देण्याचा उपक्रम जिल्हा पोलीस दलाने सुरू केला. तर जिल्ह्यात ५२ पोलीस पथकांमार्फत जनजागृतीचे समुपदेशनाचे कार्य करण्यात येत आहे. स्थलांतरीत मजूरांना त्यांच्या स्वगावी पाठविण्यामध्येही पोलीस विभागाने महत्वपूर्ण योगदान दिले आहे. ५५ वर्षावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोविड संसर्ग टाळण्यासाठी त्यांना जनसंपर्क होणारे कर्तव्य न देता फक्त कार्यालयीन काम देण्यात आले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करण्यात येत असून त्यासाठी मोबाईल पोलीस फिवर क्लिनीक सुर करण्यात आले आहे. लॉकडाऊन काळात उल्लंघन करणाऱ्या ४ हजार ५०९ प्रकरणी खटले दाखल करण्यात आले आहेत. तसेच सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आल्याचे सांगून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस व जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, अधिष्ठाता सुधीर नणंदकर यांनी केलेल्या कार्यवाहीबद्दल माहिती दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close