महाराष्ट्र

लॉकडाऊनच्या काळात महिला बचत गटांनी मास्क विक्रीतून 20 लाखांची केली कमाई

सांगली : लॉकडाऊनच्या काळात सर्वच व्यवसायिकांचे अर्थचक्र थांबलेले असताना बचत गटातील महिलांसमोर आव्हान उभे ठाकले. परंतु महिलांनी कल्पकता दाखवत व्यवसायाच्या नव्या वाटा शोधल्या. कोरानामुळे बाजारामध्ये मास्कची मागणी प्रचंड वाढल्याने ही सुसंधी महिला बचत गटांनी साधली. जिल्ह्यातील 182 महिला बचत गट मास्क शिलाई करण्यासाठी पुढे सरसावले. लॉकडाऊनच्या काळात कच्चा मालाचा तुटवडा निर्माण झाल्याने सर्व गटानी एकत्रित इचलकरंजी या ठिकाणाहून कच्चा माल मागवून घेतला व त्यापासून अडीच महिन्यात कापडी वॉशेबल 2 लाख 90 हजार मास्क शिवून जिल्हाभर माफक दरात विक्री केली. यातून तब्बल 20 लाख रूपयांची कमाई बचत गटातील महिलांना झाली.
याबाबत पलूस तालुक्यातील बांबवडे येथील साईकृष्णा महिला बचत गटाच्या अध्यक्षा मनिषा पवार म्हणाल्या, एप्रिल व मे महिन्यामध्ये त्यांच्या बचत गटांमार्फत 7 हजार मास्क शिवण्यात आले. हे मास्क पलूस तालुक्यातील सूर्यगाव ग्रामपंचायत, कवठेमहांकाळ तालुक्यातील वाघोली व गरजेवाडी ग्रामपंचायत, गावातील मेडीकलमध्ये तसेच कोल्हापूर येथेही मास्कची विक्री करण्यात आली. मास्क शिवण्याचे काम त्यांच्या बचत गटातील दोघी तिघींना मिळून अन्य गटातील महिलांनाही देण्यात आले. या मास्कची विक्री 8 ते 10 रूपये प्रमाणे करण्यात आली. त्यातून बचत गटाला चांगला फायदा झाला.
कडेगाव तालुक्यातील शिरसगाव येथील रमाई महिला बचत गटाच्या सदस्या वनिता सकटे म्हणाल्या, त्यांच्या बचत गटात 13 महिला असून एप्रिल व मे महिन्यात बचत गटामार्फत 4 हजार मास्क शिवण्यात आले. हे मास्क 10 रूपये दराने कडेगाव तालुक्यातील शिरसगाव व बोंबलवाडी या ग्रामपंचायतींना देण्यात आले. यामधून बचत गटाला लाभ झाला.
जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने केलेल्या मार्गदर्शनातून भाजीपाला व फळे विक्रीची यंत्रणा राबविली. औषधी दुकाने, रूग्णालये, जिल्हा परिषदेसह सरकारी, निमसरकारी व खाजगी कार्यालये येथे मास्क पोहोचवले. लॉकडाऊन काळात अनेक गटांनी भाजीपाला, मसाले व चटण्याचीही मोठी उलाढाल केली. प्रसंगी घरोघरी जावून भाजीपाला व फळे यांची विक्री केली. यामुळे शेतकऱ्यांनाही आर्थिक आधार मिळाला. या कामी बचत गटातील महिलांना जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव, जिल्हा व्यवस्थापक अतुल नांद्रेकर, महेश गायकवाड, स्वरांजली वाटेगावकर यांचे सहकार्य लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close