200 मे.टन द्राक्ष व 50 मे. टन डाळींबाची निर्यात : उपसरव्यवस्थापक सुभाष घुले
आटपाडी निर्यात सुविधा केंद्रातून लॉकडाऊन काळात उत्पादकांना लॉकडाऊन कालावधीत दिलासा
सांगली: कृषि पणन मंडळाने सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, पणन राज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि उत्पन्न बाजार समिती, आटपाडी येथे उभारलेल्या निर्यात सुविधा केंद्रातून प्रांजली प्रशांत नारकर, मे सदगुरु एंटरप्रायजेस ठाणे यांच्या माध्यमातून द्राक्ष व डाळिंब निर्यात सुरु करण्याबाबत प्रयत्न करण्यात आले. लॉकडाऊन कालावधीत निर्यात सुविधा केंद्र, आटपाडी येथून तासगांव, कवठेमहांकाळ, पलुस, सांगोला, आटपाडी, दिघंची व पंढरपुर या परिसरातील द्राक्ष व डाळींब उत्पादकांची 200 मेट्रिक टन द्राक्ष मलेशिया, दुबई, बांग्लादेश या देशात व 50 मेट्रिक टन डाळिंब दुबई येथे निर्यात करण्यात आली. निर्यातीमुळे द्राक्ष उत्पादकांना सरासरी दर 40 ते 50 रूपये प्रति केलो तर डाळिंब उत्पादकांना 60 ते 70 रुपये प्रति किलो दर मिळाला. आटपाडी निर्यात सुविधा केंद्रातून पहिल्यांदाच द्राक्ष व डाळींबाची निर्यात झाल्यामुळे द्राक्ष व डाळिंब उत्पादकांना लॉकडाऊन कालावधीत दिलासा मिळाला असून स्थानिक बाजारभाव वाढण्यास मदत झालेली आहे. अशी माहिती पणन विभागाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले यांनी दिली.
स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून पणन संचालक सुनिल पवार, सरव्यवस्थापक दिपक शिंदे, उपसरव्यवस्थापक सुभाष घुले, आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड यांच्या प्रयत्नाने प्राजंली नारकर यांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातून आटपाडी निर्यात सुविधा केंद्रातून पहिल्यांदाच द्राक्ष व डाळींबाची निर्यात करण्यात आली. सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्ष व डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. चालू वर्षी द्राक्ष व डाळिंब उत्पादकांना सरुवातीस अतिवृष्टीमुळे महापुराचा तडाखा बसलेला होता. त्यामधुन सावरुन शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करुन द्राक्ष व डाळिंबाचे चांगले उत्पादन घेतलेले होते. हंगामाच्या सुरुवातीस जगभरात कोविड-19 या कोरोना विषाणूनेे हातपाय पसरण्यास सुरुवात केली. कोरोना विषाणुमुळे संपुर्ण देशभर लॉकडाऊन केल्यामुळे ऐन हंगामात स्थानिक बाजार पेठात द्राक्षाचे दर 15 ते 20 रुपये प्रति किलो व डाळिंबाचे दर 25 ते 30 रुपये प्रति किलो पर्यंत खाली आलेले होते. तसेच वाहतुक निर्बंध व मजुर स्थलातंरामुळे निर्यातीवरती सुध्दा मर्यादा आलेल्या होत्या.