ताज्या घडामोडी

पालकमंत्री जयंत पाटील यांची मणदुरला भेट गावकऱ्यांना दिला दिलासा

सांगली : कोरोणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई व अन्यत्र नोकरीनिमित्त राहणारे अनेक लोक आपल्या मूळ गावी परतले आहेत. यात शिराळा पश्चिम भागातील अनेक जणांचा समावेश आहे. या लोकांना आता त्यांच्या आस्थापनांकडून लवकरात लवकर कामावर हजर होण्याबाबत सांगण्यात येत आहे. कंटेनमेंट झोन लागू असलेल्या गावातील लोकांना पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणी हजर होता यावे यासाठी त्यांचे स्वाब घेऊन कोरोना तपासणी करण्यात यावी व अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना त्याप्रमाणे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.
मणदुर येथे 56 रुग्ण कोरोणा बाधित आढळले असून या पार्श्वभूमीवर जलसंपदामंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज गावाला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला व गावकऱ्यांना दिलासा दिला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गुडेवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भोपाल गिरीगोसावी, उपविभागीय अधिकारी नागेश पाटील, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी अनिल बागल, सभापती वैशाली माने, पंचायत समिती सदस्य बी .के. नायकवडी, मनीषा गुरव, सरपंच वसंत पाटील, तालुका आरोग्य अधिकारी प्रवीण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
मणदूर येथे मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने कंटेनमेंट झोन आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंत पाटील यांनी गावकऱ्यांकडून त्यांच्या समस्या जाणून घेत यंत्रणेला सूचना दिल्या. यावेळी त्यांनी सदरचा भाग दुर्गम असल्याने रुग्णाला वैद्यकीय निकडीच्या वेळी गोल्डन आवरमध्ये उपचार मिळावेत यासाठी आयसोलेशनच्या आवश्यक सुविधा शिराळा व कोकरूड येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपलब्ध व्हाव्यात असेही सूचित केले. तसेच कंटेनमेंट झोनमध्ये दूध संकलनात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी संकलकांनी पशुपालकांकडे जाऊन दूध संकलन करावे असे सांगितले. मुंबई तसेच परगावहून मूळ गावी आलेल्या ज्या लोकांना कुठेच रेशनिंगचे धान्य मिळाले नाही अशांना योजनेतील धान्य देण्याबाबत ना. पाटील यांनी सूचना दिल्या. यावेळी त्यांनी आरोग्य, महसूल विभागाकडील उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच गावकऱ्यांनी लॉकडाऊन व्यवस्थित पाळावा, सर्वांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, आरोग्य यंत्रणांनी कोरोणा बाधित रुग्णांची, क्वारंटाईन लोकांची काळजी घेत असतानाच कोमार्बीडीटी असणाऱ्यांची विशेष काळजी घ्यावी. असेही त्यांनी यावेळी निर्देशित केले.
मणदूर गावाला दिलेल्या भेटीनंतर पालकमंत्री जयंत पाटील यांनी चांदोली धरणाच्या जलाशयाची पाहणी केली. मान्सून काळात आवश्यक सतर्कता ठेवण्याच्या दृष्टीने यंत्रणांना सूचना देऊन ऑगस्ट महिन्यात विहित पाणीसाठा धरणात ठेवून विसर्गा बाबत सूचना दिल्या. धरणाची सध्याची पाणी पातळी, याच कालावधीतील गतवर्षीची पाणी पातळी, धरण क्षेत्रात गतवर्षी झालेला पाऊस व चालू मान्सूनमध्ये आतापर्यंत झालेला पाऊस याची माहिती घेऊन या परिसरात पर्यटन वाढीला चालना देण्याच्या दृष्टीनेही त्यांनी चर्चा केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close