पाटबंधारे विभागाने रियल टाईम डिसिजन सपोर्ट सिस्टीम 30 जूनपूर्वी सक्षमपणे कार्यान्वीत करावी : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : सद्यस्थितीत रियल टाइम डिसिजन सपोर्ट सिस्टीम हे मॉडेल अत्यंत चांगले असून आपतकालीन नियोजनासाठी याची खूप मोठी मदत होणार आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने ही यंत्रणा 30 जूनपूर्वी सक्षमपणे कार्यान्वीत ठेवावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
जलसंपदा विभागाच्या जलविज्ञान प्रकल्पाअंतर्गत पावसाळ्यात पूर्वानूमान व त्या आधारीत नियोजनासाठी रियल टाइम डिसिजन सपोर्ट सिस्टीम विकसित करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसिंचन विभागाअंतर्गत ही मोठी उपलब्धी असून या आधारे अत्यंत विश्वासार्ह डाटा बेस तयार होतो. यास अनूसरून गतवर्षीच्या महापूराच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसाठी RTDAS प्रणालीच्या माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस,अपर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, अपर पोलिस अधीक्षक मनिषा डुबुले, सांगल पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता गुणाले, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, कार्यकारी अभियंता नामदेव करे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खोरे समरूपण विभाग पुणेचे उपविभागीय अभियंता संजय हेगन्ना यांनी या प्रणाली बद्दल मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले ,रियल टाइम डिसिजन सपोर्ट सिस्टीम या प्रणालीमुळे आपत्कालीन काळात संभाव्य पूरस्थितीबद्दल किमान 48 तास आधी माहिती उपलब्ध होईल. त्यामुळे आपत्कालीन स्थिती नियंत्रणासाठी यांची मोठी मदत होईल.पाटबंधारे विभागने पडणारा पाऊस व धरणातून होणारा विसर्ग यांची शास्त्रशुध्द व वस्तूनिष्ठ माहिती प्रशासनाला त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज ठेवावी. महसूल यंत्रणेने जिल्ह्यातील पूर बाधित 104 गावांचे पाणीपातळीनिहाय आराखडे तात्काळ तयार करावेत.आराखडे तयार करत असताना यामध्ये स्थानिक लोकांचाही सहभाग घ्यावा. पाटबंधारे विभागाने किती पाणी पातळीला कोणती गावे बाधित होतात याची वेळोवेळी माहिती द्यावी. त्यानुसार नागरिक व त्यांची जनावरे यांच्या स्थलांतराचे नियोजन करता येईल.
संजय हेगन्ना यांनी या प्रणाली बद्दल सर्वकष मार्गदर्शन करताना सन 2005 मध्ये आलेल्या महापूराच्या अभ्यासाठी नेमलेल्या समितीने RTDAS सारखी प्रणाली असणे आवश्यक असल्याचे मत नोंदविले होते. त्या अनुषंगाने 2014 पासून ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. आपत्कालीन काळात विश्वसनीय माहिती देणारी प्रणाली असून संभाव्य पूरस्थितीचे पूर्वानूमान किमान 48 तास आधी करता येत असल्याने संभाव्य वित्त व जिवित हानी टाळता येणे शक्य आहे. त्यासाठी या प्रणालीचा वापर सर्वानी करावा.यावेळी त्यांनी या यंत्रणेची वैशिष्टे,उपयुक्तता,अंतर्भूत बाबी, तात्काळ व किफायतशीर डेटा, समस्यांचे योग्य आकलन, माहितीची जलद व वारंवार उपलब्धतता, मोजमापातील सातत्य याबद्दल सविस्तर माहिती दिली.