‘कोरोनाच्या सद्यस्थितीची अचूक माहिती लोकप्रतिनिधींना मिळणार’

पुणे : कोरोनाचे संशयित आणि पॉझिटिव्ह रूग्ण यांचे प्रभागनिहाय तपशील उपलब्ध झाल्यास त्यानुसार प्रशासनाच्या मदतीने लोकप्रतिनिधींना उपाययोजना करता येतील, तसेच नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यातही लोकप्रतिनिधी प्रशासनाला मदत करू शकतील, यासाठी कोरोनाच्या सद्यस्थितीची सांख्यिक माहिती (GIS Data) लोकप्रतिनिधींना मिळावी अशी मागणी मी सातत्याने करत होते आणि यानुसार आयुक्त गायकवाड यांनी, किती नागरिकांच्या तपासण्या झाल्या, त्या कोणत्या भागात झाल्या, त्यात संशयित, पॉझिटिव्ह यांची संख्या किती आहे, त्यांचा वयोगट कोणता आहे आदींचा तपशील असलेली अचूक शास्त्रीय सांख्यिक माहिती (जीआयएस डेटा) नियमितपणे लोकप्रतिनिधींना देण्यात येईल, असे काल बैठकीत आश्वासन दिले. या निर्णयामुळे त्या-त्या प्रभागांत लोकप्रतिनिधींना नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करता येणार आहे.
कोरोनाची शहरातील सद्यस्थिती आणि नजीकच्या काळात त्याचा सामना कसा करायचा, या बाबत मी केलेल्या विनंतीनुसार, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्मार्ट सिटीच्या कमांड ॲंड कंट्रोल सेंटरमध्ये यासंदर्भात गुरुवारी बैठक आयोजित केली होती.
प्रतिबंधित क्षेत्राबाहेर पुरेशी काळजी घेऊन जनजीवन सुरळीत करण्यासाठी महापालिकेने पोलिस प्रशासनाशी संवाद साधावा असे देखील यावेळी सूचविण्यात आले. तसेच क्वारंटाईन सेंटरमधील मूलभूत सुविधा- त्यातील कमरता, त्यासाठीच्या उपाययोजना, चाचणी अहवालातील विलंब, डॉक्टर- कर्मचाऱयांची अपुरी संख्या, पीपीई किट, विविध शासकीय यंत्रणांमधील समन्वय तसेच महापालिकेचे कर्मचारी कोरोनामुळे बाधित होत आहेत त्यासाठी त्वरित खबरदारी घेणे असे विविध मुद्दे देखील यावेळी उपस्थित करण्यात आले. यासर्व मुद्दयां संदर्भात आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत आयुक्त गायकवाड यांनी सकारात्मकता दर्शवली व तसेच क्वारंटाईन सेंटरमध्ये पुरेशा सुविधा पुरविण्यात येतील, असे यावेळी सांगितले. तसेच त्याबाबत कार्यवाहीचे देखील आदेश दिले.
यावेळी माजी महापौर अंकुश काकडे, दत्ता धनकवडे, आमदार चेतन विठ्ठल तुपे, सुनील टिंगरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, तसेच शिवसेनेचे गटतेने पृथ्वीराज सुतार, मनसेचे गटनेते वसंत मोरे, बाबा धुमाळ उपस्थित होते.
महापालिकेची आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी, सामुदायिक मदतीची आवश्यकता आहे यासाठी विवध सामाजिक संस्था यांचे सहकार्य घेणे महत्वाचे आहे त्यासाठी धर्मादाय आयुक्तांसोबत बैठक घ्यावी, अशी सूचना अंकुश काकडे आणि अरविंद शिंदे यांनी केल्या. तसेच प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागनिधीतून उपलब्ध झालेल्या रुग्णवाहिकांचा प्रशासनाने उपयोग करून घ्यावा, असे आवाहन शिंदे यांनी केले.
कोरोनाच्या रुग्णांची संख्या नियंत्रित करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. यात प्रामुख्याने घराबाहेर पडू नये, मास्क परिधान करावे तसेच सोशल डिस्टंनसिंग चे नियम पाळण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.