‘आमदार गोपीचंद पडळकर यांचे सांगली जिल्हाभर विजयी गुढी उभारून स्वागत करणार’

सांगली : गोपीचंद पडळकर यांचे सांगलीत आगमन होताच संपूर्ण सांगली जिल्हाभर १५ मे रोजी विजयाची गुढी उभा करून स्वागत करणार, अशी माहिती भाऊसो दुधाळ, रमेश खामकर, प्रभाकर अनिल सूर्यवंशी यांनी दिली आहे.
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक जाहीर झाली. यामध्ये भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी दिली. यामध्ये गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते पाटील, प्रवीण दटके, रमेश कराड यांची बिनविरोध विधानपरिषदेवर निवड झाली आहे. गेली एक तप प्रस्थापित राजकीय व्यवस्थेविरुद्ध लढा देणारे, गावगाड्यातील शेवटच्या माणसाला न्याय मिळण्यासाठी अनेकवेळा मोर्चे, आंदोलने, उपोषण आणि आरक्षणाचा लढा उभा करणारे महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे आयडॉल गोपीचंद पडळकर यांची महाराष्ट्र विधानपिरषदेवर आमदार म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात बहुजन समाजात उत्साहाचे वातावरण आहे. सामान्य माणसाला न्याय दिल्याची भावना संपूर्ण जिल्हाभर आहे. सध्या महाराष्ट्रावर आणि सांगली जिल्ह्यावर कोरोनाचे संकट आहे. लॉक डाऊनचा काळ सुरु आहे. शासनाला सर्वतोपरी सहकार्य करून कोरोनाला हरवण्यासाठी सर्वजण घरातच थांबून विजयाचा आनंद साजरा करण्याचे ठरले आहे.
निवडणुकीची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर गोपीचंद पडळकर हे १५ मे रोजी सांगलीत येतील. त्याचे आगमन होताच संपूर्ण सांगली जिल्ह्यातून विजयाची गुढी उभारून त्यांचे स्वागत करण्याचे ठरले आहे, अशी माहिती भाऊसो दुधाळ, रमेश खामकर, प्रभाकर पुजारी, अनिल सूर्यवंशी यांनी दिली आहे.