इरफान खान यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
इरफान खान यांचे निधन धक्कादायक आहे. इरफान खान हे सामाजिक जाण असणारे प्रतिभावंत कलाकार होते. आपल्या सशक्त अष्टपैलू अभिनयामुळे त्यांनी अनेक चित्रपट तसेच मालिकांमधील भूमिका संस्मरणीय केल्या. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीचे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाचे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना देवो, ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.
तडफदार तरुण नेतृत्व हरपले
नाविद अंतुले यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली
मुंबई :- नाविद अंतुले यांच्या आकस्मिक निधनामुळे एक तरुण तडफदार नेतृत्व आपल्यातून गेले, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाविद अंतुले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, नाविद यांच्या आकस्मिक निधनाची बातमी कळाली आणि धक्का बसला. वडील माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे पुत्र अशी त्यांची ओळख असली तरी शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय सहभाग घेऊन एक तरुण, तडफदार युवा नेते अशी त्यांची ओळख रायगड जिल्ह्यातल्या जनतेला होऊ लागली होती. त्यांच्या अकाली निधनाने निश्चितपणे एक तरुण नेतृत्व आपल्यातून गेले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.