ताज्या घडामोडी

कोल्हापूर : मालवाहतूक, उद्योगधंदे सुरू होताना लॉकडाऊनही तितकेच तीव्र करा : जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर : मालवाहतूक व उद्योगधंदे सुरू करण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य शासनाने घेतला आहे. यामध्ये मालवाहतूक वाहनांमुळे व उद्योगधंदे सुरु होत असल्याने जिल्ह्यांतर्गत वाढणाऱ्या हालचालीमुळे होणारा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन अधिक तीव्र करण्याची जबाबदारी पूर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्ह्यातील अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक आणि प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडीओ कॉन्फरंन्सिंगव्दारे संवाद साधला. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे हे उपस्थित होते. तर मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी व्हिडीओ कॉन्फरंन्सिंगव्दारे सहभाग घेतला.

जिल्हाधिकारी. देसाई म्हणाले, आपण सर्वांनी चांगलं काम केलं असल्यामुळे आपण चांगल्या टप्प्यावर आहोत. या कामात यापुढेही ढिलाई होता कामा नये. केंद्र आणि राज्य शासनाने काही प्रमाणात मर्यादा उठवल्याने अर्थव्यवस्था सुरू झाली आहे. मालवाहतूक वाहनामध्ये चालक अधिक दोन अशा तिघांनाच परवानगी देण्यात आली आहे. किमान 1 हजार वाहने ही मुंबई, पुणे यासारख्या संसर्गित गावात जात असतात. वाहनामध्ये कमीत-कमी दोन व्यक्ती जरी पकडल्या तरी या लोकांचा किमान पाच ते दहा जणांशी सहवास येवू शकतो. म्हणजे एक वाहन 20 लोकांच्या संपर्कात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंदाजे 20 हजार लोकांचा संपर्क होवून वाहने जिल्ह्यात येवू आणि जावू शकतात. या वाहनांचे चालक व वाहक यांनी प्रथम स्वत:ची काळजी घेतली पाहिजे, सुरक्षित राहिले पाहिजेत. माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून प्रवाशी आणू नयेत, पोलीस यंत्रणेने त्यावर लक्ष ठेवावे व असा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधिताचा माल वाहतूक परवाना रद्द करुन वाहन जप्त करावे.

तपासणी नाक्यांवर काटेकोर अंमलबजावणी करा

जिल्ह्यातील 19 तपासणी नाक्यांवर काटेकोर तपासणी करा. विशेषत: मालवाहतूक वाहनांमध्ये तिघांशिवाय अन्य कोणी असता कामा नये, याची काळजी घ्या, असे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, सक्तीने मास्कचा वापर हवा. त्यांच्याकडे सॅनिटायझर आहे का. नसल्यास देणे गरजेचे आहे. वाहतुकदार संघटनेची बैठक घेवून त्याबाबत त्यांना खबरदारी घेण्याबाबत सूचना द्याव्यात. प्रभाग समिती, स्वयंसेवक यांची मदत घेवून सीमा बंदीचे कडक नियंत्रण करा. विशेषत: झोपडपट्टी परिसरात याबाबत दक्ष रहावे. अशा ठिकाणीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. अद्यापही दुचाकीवरून डबलसीट प्रवास होत आहे. रूग्ण, दिव्यांग, सुरक्षा सेवा वगळता अशा वाहनांवर कारवाई करावी, असे निर्देश देवून सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे व क्षेत्रीय पोलीसांचे त्यांनी केलेल्या सेवेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील व शहरातील जनतेने आतापर्यंत दाखवलेल्या संयमाबद्दल त्यांचे आभारही मानले.

कोल्हापूर शहर, इचलकरंजी, गडहिंग्लज इत्यादी शहरांमधील प्रभागनिहाय हालचाल बंदीचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. पुणे, मुंबईचा अनुभव पाहता नागरिकांनी अत्यावश्यक कारणाव्यतिरिक्त आपला प्रभाग सोडून दुसऱ्या प्रभागात जावू नये. मागील दोन-तीन दिवसात याचे पालन कोल्हापूर शहरात होत नाही, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संचारबंदी आदेशाचे उल्लंघन होवू न देण्यासाठी पोलीस विभागाने कणखरपणे अंमलबजावणी करावी. लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या भागात विषाणूचा प्रादुर्भाव त्याचा प्रसार व संसर्ग रोखणे शहरात अत्यंत अवघड होईल. त्यामुळे नागरिकांनी अजून काही दिवस संयम ठेवावा व पोलीस विभागास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close