प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची रक्कम पोस्टाद्वारे लाभार्थ्याच्या घरी पोहोच करा : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : करोना विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व संसर्गबाधित असल्यास त्यात अधिक वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयकृत बँकेंमध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील पात्र लाभार्थी पैसे काढण्यासाठी मोठ्याप्रमाणावर एकत्र येवून गर्दी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व बँकांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील पात्र लाभार्थ्यांची गाव निहाय यादी जिल्हा अग्रणी बँकेकडे त्वरीत सादर करावी, जिल्हा अग्रणी बँकेने सदरची यादी एकत्रित करुन पोस्ट ऑफिसकडे जमा कराव्यात, पोस्ट ऑफिसने लाभार्थ्यांना त्यांच्या घरी जावून सदरची रक्कम अदा करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सर्व संबधित यंत्रणेला निर्गमित केले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिताविरूध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्वये तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईन व पुढील कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.