ताज्या घडामोडी

अवैद्यकीय महाविद्यालयांच्या हॉस्पिटल्समध्ये चाचणी सुविधा उपलब्ध करणार :आरोग्य मंत्री राजेश टोपे

मुंब ई : आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी खा. शरद पवार साहेब यांची सिल्व्हर ओक येथील निवासस्थानी भेट घेऊन कोरोना साथीवरील उपाययोजनांबद्दल माहिती दिली.
राज्यात विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने प्रशासन स्तरावर विषाणूचा फैलाव होऊ नये याची कोणती खबरदारी घेतली आहे, तसेच मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये लॉकडाऊन संदर्भात कशाप्रकारे अधिसूचना जारी केल्या आहेत, या संदर्भातली माहिती टोपे यांनी पवारसाहेबांना दिली. तसेच जीवनावश्यक वस्तूंचा तसेच औषधोपचारांचा तुटवडा होऊ नये यासाठी संबंधित आस्थापनांना सूचना देण्यात आल्याचे व खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होमचे निर्देश देण्यात आल्याचे, तसेच सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी यांनी पवारसाहेबांना दिली.
यावेळी खा. शरद पवार साहेबांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी संपर्क साधून राज्याच्या आरोग्य मंत्र्यांच्या त्यांच्याशी थेट संवाद करून दिला. राज्यातील खासगी लॅबना कोरोना संदर्भांत तपासणी करण्याची परवानगी देण्यात यावी असा आग्रह महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना केली.

कोरोना विषाणूचा फैलाव वाढू नये यासाठी आता सर्व वैद्यकीय महाविद्यालयांच्या हॉस्पिटल्समध्ये चाचणी सुविधा उपलब्ध करून देण्याची राज्य शासनाची तयारी आहे. याबाबत आदरणीय खा. शरद पवार साहेब यांच्याशी चर्चा झाली असून केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी देखील चर्चा करण्यात आली, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी दिली.

आज कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ६३ वर गेला आहे. कोरोनाचा संसर्ग झालेले एकूण ११ रुग्ण आहेत. त्यातील १० मुंबईचे आणि १ पुण्याचा आहे. तिघांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ८ जणांना परदेशातच संसर्ग झाला होता, असे ना. राजेश टोपे यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येणाऱ्या इंडियन काउंसिल फॉर मेडिकल रिसर्च म्हणजे आयसीएमआर यांची मार्गदर्शक तत्वे १०० टक्के पाळण्याचे काम राज्य सरकार करत आहे. नियमात बसत असेल तर जास्तीच्या चाचणी सुविधा उपलब्ध करून देण्याचा आग्रह डॉ. हर्षवर्धन यांना केल्याचे ना. राजेश टोपे यांनी सांगितले. यापुर्वी राज्यात ३ प्रयोगशाळा होत्या आता ७ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. प्रयोगशाळांची संख्या १२ ते १५ जाणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने राज्य सरकार काम करत असल्याचेही ना. राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

शिवाय कोरोनाचा संसर्ग झाला आहे त्यांचे विलगीकरण करून त्यांना कुठून लागण झाली याची तपासणी करण्यावर अधिक भर द्यायला पाहिजे. त्यासाठीच्या चाचणी सुविधांसाठी प्रयोगशाळांचा महत्वाचा मुद्दा याठिकाणी आहे. याबाबत डॉ. हर्षवर्धन यांनी विश्वास दिला असून त्यांनी आयसीएमआरचे प्रमुख डॉ. अरविंद भार्गव यांनाही याबाबत सांगितल्याचे ना. राजेश टोपे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे किट्स हा विषयही महत्वाचा आहे. ते कमी पडू नये त्यासाठी किट्सचीही मागणी केली आहे, असेही ना. राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

काल मुंबई महानगरसह पुणे, पिंपरी- चिंचवड आणि नागपूर येथील सर्व कार्यालये आणि संपूर्ण दुकाने बंद केल्याने मोठ्या प्रमाणावर कामगार, विद्यार्थी घरी जाण्याच्या दृष्टीने रेल्वे परिसरात गर्दी करत आहेत. यासंदर्भात मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली. त्यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना याबाबत सांगून जादा रेल्वेचे डबे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार आहे. तसेच बेस्ट आणि रेल्वेवरचा ताण कमी करण्यासंदर्भात सरकार प्रयत्नशील आहे. अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याची सरकारने परवानगी दिली आहे. परंतु, गर्दी वाढणारच असेल तर मुंबई लोकल बंद करावी लागेल, असेही ना. राजेश टोपे यांनी आवर्जून सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close