महाराष्ट्र

यात्रा, जत्रा, महोत्सव, मेळावे, शासकीय कार्यक्रम, गर्दी होणारे कार्यक्रम स्थगित करा : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : करोनाचा संसर्ग होवू नये यासाठी जनतेची सुरक्षितता व आरोग्य याला सर्वोच्च प्राधान्य असून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगली जिल्ह्यात नजीकच्या काळात होणारे यात्रा, जत्रा, महोत्सव, मेळावे, शासकीय कार्यक्रम तसेच गर्दी होणारे कार्यक्रम तात्पुरते स्थगीत करावेत, असे आवाहन नागरिकांना तसेच आयोजकांना केले आहे.
करोना संदर्भात उपाययोनांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यामध्ये मुख्य सचिव अजोय मेहता व सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव श्री. व्यास यांनी करोना आजाराचा प्रतिबंध व घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. यानंतर आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रूग्णालय मिरज चे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक तथा नोडल अधिकारी डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) राहुल गावडे आदि उपस्थित होते.
सांगली जिल्ह्यात एकही करोना बाधित रूग्ण नाही. तसेच विलगीकरण कक्षात देखील एकही रूग्ण नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये. करोना बाधीत देशातून आलेल्या प्रवाशांवर आरोग्य विभागामार्फत गृहभेटीव्दारे संपर्क व पाठपुरावा चालू आहे. आजतागायत एकूण ६१ प्रवाशी परदेशवारी करून सांगलीत आले आहेत. त्यापैकी १४ प्रवाशांचा क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. सद्या कोणत्याही प्रवाशांना करोनाच्या संसर्गाचे कोणतेही लक्षण दिसून येत नाही. असे असले तरी कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी स्वत:हून आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन परदेश प्रवासाहून आलेल्यांना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
केंद्र शासनाने चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या सात देशातून आलेल्या प्रवाशांना क्वॉरंटाईन करण्याबाबत सूचित केले आहे. पुणे येथे करोनाचे 9 रूग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रूग्णांची प्रकृती स्थीर आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक असून आपल्या कुटुंबाची सुरक्षितता सर्वोच्च मानून परदेश प्रवासाहून आलेल्या प्रत्येक नागरिकाने जिल्हा शल्य चिकित्सक तथा नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती द्यावी. त्यामुळे त्यांचा संपर्क, पाठपुरावा करणे शक्य होईल. अशा प्रवाशांनी स्वत:हून काळजी घेत 14 दिवसांपर्यंत घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
अनावश्यक गर्दी होईल असे सार्वजनिक कार्यक्रम, शिबीरे, मेळावे आयोजकांनी स्थगीत करावेत, टूर्स आणि ट्रॅव्‍हल कंपन्यांनी नवीन सहलींची बुकींग स्थगीत करावीत. तसेच येणाऱ्या प्रवाशांची माहिती तात्काळ जिल्हा शल्य चिकित्सकांना, करोना नियंत्रण कक्षाला द्यावी.
नागरिकांना करोना संदर्भात आवश्यक माहितीसाठी सांगली जिल्ह्याकरिता नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला असून नागरिकांनी 0233-2373032 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. याबरोबरच राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 91-11-23978046, राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष 020-26127394, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 104 यावरही संपर्क साधता येईल. लक्षणे आढळल्यास आपल्या जवळील शासकीय रूग्णालयाशी उपचारासाठी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
सार्वजनिक स्वच्छता गृहे, सार्वजनिक जागा, चित्रपटगृहे, मॉल यामध्ये स्वच्छता ठेवा तसेच हॉटेल, लॉज, ढाबे यामध्ये येणाऱ्या नागरिकांचे बसण्याचे टेबल, नेहमी हाताळणारे मेनूकार्ड, वॉश बेसीन, वॉश बेसीनचे नळ, शौचालय, रेलींग तसेच ज्या ठिकाणी नागरिकांचा हाताचा स्पर्श होऊन संसर्गजन्य रोगाचा प्रादुभाव वाढण्याची शक्यता आहे, या सर्व बाबी दिवसातून वारंवार निर्जुंतुकीकरण करण्यात यावे.
वरचेवर हात धुणे, व परदेशातून आल्यास स्वत:च्या घरात १४ दिवस अलिप्त रहाणे हा करोना प्रतिबंधाचा सर्वात सोपा व परिणामकारक उपाय असल्याने याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close