गोवा

जीआयएम, रायबंदर येथे लवकरच “आयुष क्लिनिक”

गोवा : राज्य सरकारने रायबंदर येथील इलीहास येथे जून्या ‘गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ’च्या (जीआयएम) मुख्य इमारतीचा संपूर्ण तळ मजला केंद्रीय आयुष मंत्रालयाला दिला आहे. एकुण सुमारे 1600 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या जागेसोबत निवासी क्वार्टरमधली 252 चौमी. जागाही आयुष मंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

या जागी स्थानिकांच्या आरोग्य तपासणीसाठी आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथीयुक्त आयुष केंद्र खोलले जाणार आहे. सदर जागा दिल्याबद्दल राज्य सरकारचे केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी आभार मानले आहे.
आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी (आयुष) या पारंपारिक औषध प्रणाली भारताच्या सार्वजनिक आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. आपल्या देशातील सार्वजनिक आरोग्यासाठी वाढत असलेला धोका पाहता आयुष प्रणालीला मानवाच्या जीवनशैलीशी संबंधित दीर्घकालीन आरोग्य व्यवस्थापनात अधिक महत्त्व निर्माण झाले आहे.
याशिवाय, पेडणे तालुक्यात धारगळ येथे अखिल भारतीय आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार संस्थेच्या इस्पितळाचे बांधकाम याआधीच सुरू झाले असून त्यासाठी 2 लाख चौरस मीटर जमीन आधीच शासनाने मंजूर केली आहे. या इस्पितळासाठी सुमारे 301 कोटींचा खर्च अपेक्षित असून, पहिल्या टप्यात 250 खाटांचे रुग्णालय, तज्ज्ञ डॉक्टर, संशोधन केंद्र, ओपीडीची व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. या संस्थेत पदवी,पदव्युत्तर आणि पीएचडी पर्यंतच्या शिक्षणाच्या सेवासुविधा असणार असून यात विविध शाखेत सुमारे 500 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. यात गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी खास 50 टक्के आरक्षण ठेवले जाणार आहे. तसेच, या संस्थेतील ‘क’ आणि ‘ड’ कर्मचारी राज्य सरकारकडून नेमणूक केले जाणार आहे.
राज्यातील उत्तर आणि दक्षिण जिल्हा इस्पितळासाठी ‘राष्ट्रीय आयुष मिशन’च्या अंतर्गत 30 कोटी रुपये राज्य सरकारला मंजूर करण्यात आले असून सदर इस्पितळांचे बांधकाम लवकरच सुरू केले जाणार आहे. बांबोळी येथील गोमेकॉचा दर्जा वाढवण्यासाठी ‘प्रधानमंत्री स्वास्थ सुरक्षा योजने’खाली 11 विविध विभागांसाठी 555 खाटांचे, सुपर स्पेशलिटी इस्पितळासाठी 386.35 कोटींचा निधी दिला जाणार आहे. तसेच, सुमारे 45 कोटी खर्चून ‘टर्शरी कॅन्सर केअर सेंटर’चीही उभारणी केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेखालील ‘वेलनेस सेंटर’ ही गोमेकॉत खोलले जाणार आहे. उत्तर गोवा खासदार तथा केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी मागील पाच वर्षात केलेल्या पाठपुराव्यामुळे या आरोग्य संस्था राज्यात जनतेच्या सेवेसाठी तसेच विद्यार्थी व संशोधकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लवकरच दाखल होणार आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close