लोकराज्य’चा ‘मराठी भाषा गौरव दिन’ विशेषांक प्रकाशित
मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई अंकाचे अतिथी संपादक
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या लोकराज्यचा फेब्रुवारीचा अंक मराठी भाषा विशेषांक म्हणून प्रकाशित करण्यात आला. या अंकाचे प्रकाशन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मंत्रालयात झाले.
यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, संचालक (माहिती व वृत्त) सुरेश वांदिले, उपसंचालक अनिल आलूरकर, विभागीय संपर्क अधिकारी अर्चना शंभरकर उपस्थित होते. या अंकाचे अतिथी संपादक मराठी भाषा मंत्री श्री. देसाई हे आहेत.
27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त ‘लोकराज्य’ने हा विशेषांक प्रकाशित केला. या विशेषांकात मराठी भाषेचे महत्त्व आणि ती अभिजात भाषा कशी आहे याचा ऊहापोह करणारा हरी नरके यांच्या लेखाचा समावेश आहे. त्यासोबतच सभोवताली मराठीचे महत्व, संगणकीय युगात मराठीचा वापर, मराठीचे संवर्धन , त्यासाठी राबवले जाणारे विविध उपक्रम याविषयी माहिती देणाऱ्या माहितीपूर्ण लेखांचा अंकात समावेश करण्यात आला आहे., त्यासाठी राबवले जाणारे विविध उपक्रम याविषयी माहिती देणाऱ्या माहितीपूर्ण लेखांचा अंकात समावेश करण्यात आला आहे.
मराठी भाषा मंत्री श्री. देसाई व राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी मराठी भाषेचे वैभव व संवर्धन याविषयी मनोगत व्यक्त केले आहे. त्याचबरोबर या अंकात महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाची वाटचाल, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा सांगली दौरा, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा पर्यटन विकासासंबंधीचा रोडमॅप, मराठवाडा डायरी, महिनाभरातील महत्त्वाच्या घडामोडी, मंत्रीमंडळ निर्णय, पाणीटंचाईवर मात या विषयांवरील लेखांचा समावेश आहे.
गडकिल्ले, प्रेरणा, नोंदणी व मुद्रांक शुल्क, सायबर सुरक्षा या सदरांचाही यात समावेश आहे. त्याचबरोबर विविध देशांचे आपल्या देशासोबत व राज्यासोबतचे मंत्रिपूर्ण संबंध व सांस्कृतिक वारसा याची ओळख करून देणारे ‘नाते जगाशी’ हे नवीन सदर या अंकापासून सुरू करण्यात आले आहे. विविध विषयांचा धांडोळा घेणाऱ्या या विशेषांकाची किंमत दहा रुपये एवढी असून अंक स्टॉलवर सर्वत्र उपलब्ध आहे.